
हिंदुस्थान आणि पाकिस्तान यांच्यातील युद्ध आपणच थांबवले अशी फुकटची फौजदारकी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी चालवली आहे. आता तर त्यांनी मी हिंदुस्थान-पाकिस्तान यांच्यातील अणुयुद्ध थांबवल्याचा दावा केला आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी ही सात दिवसांत सहाव्यांदा मारलेली कोलांटउडी आहे.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी फॉक्स न्यूजला एक मुलाखत दिली असून त्यात पुन्हा एकदा हिंदुस्थान-पाकिस्तान यांच्यातील युद्ध आपणच थांबवल्याचे डफडे वाजवले. यावेळी एक पाऊल पुढे जाऊन ट्रम्प यांनी दोन्ही देशातील तणाव एवढा वाढला होता की अणुयुद्ध होण्याची भीती निर्माण झाली होती. पुढचे पाऊल काय असेल या चिंतेने जगही घाबरले होते. ‘एन’ अर्थात न्यूक्लीयर म्हणजेच अणुयुद्ध! पण हे युद्ध होण्यापासून मी रोखले. आतापर्यंतच्या राजकीय कारकीर्दीतील हे आपले सर्वात मोठे यश आहे. परंतु त्याचे म्हणावे तसे श्रेय आपल्याला मिळाले नाही अशी ‘मन की बात’ही त्यांनी बोलून दाखवली.
युद्ध थांबवा, व्यापार करू
हिंदुस्थान-पाकिस्तान या दोन्ही देशांनी आक्रमकपणे टाकलेले पाऊल मागे घ्यावे यासाठी मला प्रचंड दबाव आणावा लागला. परंतु परिस्थिती आटोक्यात येत नसल्याचे पाहून शेवटी मी दोन्ही देशांना युद्ध थांबवले तर तुमच्यासोबत व्यापार वाढवू असा प्रस्ताव दिला आणि दोन्ही देशांनी तो मान्य केला, अशी दर्पोक्तीही ट्रम्प यांनी केली. व्यापाराचा विषय केवळ शांततेसाठीच होत असेही ट्रम्प म्हणाले.
ट्रम्पचालिसा
- 10 मे – मी युद्ध थांबवले. हिंदुस्थान-पाकिस्तान यांनी युद्धविराम करण्यावर सहमती दाखवली असून सायंकाळी पाच वाजेपासून ती लागू होईल.
- 11 मे – सध्या तणाव थांबवण्याचा काळ आहे. हिंदुस्थान-पाकिस्तान यांनी समंजस भूमिका घेतली. कश्मीर प्रश्नावर तोडगा काढण्याचा मी प्रयत्न करेन.
- 12 मे – मी अणुयुद्ध थांबवले आहे. दोन्ही देशांमध्ये युद्धविराम करण्यासाठी अमेरिकेने मदत केली आहे. हा युद्धविराम कायमस्वरूपी असेल.
- 13 मे – दोन्ही देशांमधील युद्धविराम घडवून आणण्यासाठी मी व्यापाराचा मोठय़ा प्रमाणात वापर केला. शांतता प्रस्थापित करणे हे माझे स्वप्न होते.
- 15 मे – दोन्ही देशांमध्ये मी मध्यस्थी केली नाही. पण तणाव निवळण्यासाठी मदत मात्र जरूर केली.
- 16 मे – दोन्ही देश अणुयुद्धाच्या उंबरठय़ावर होते. मी अणुयुद्ध रोखले. पण मला त्याचे श्रेय मिळाले नाही.