अॅपलपाठोपाठ सॅमसंगलाही बजावले हिंदुस्थानात उत्पादन करू नका! मोदींचा मित्र ‘डोलांड ट्रम्प यांचा पुन्हा टेरिफ स्ट्राईक

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अॅपलपाठोपाठ सॅमसंग या मोबाईल कंपनीलाही हिंदुस्थानसह इतर देशांमध्ये उत्पादन करू नये असे बजावले आहे. अमेरिकेत विकल्या जाणाऱ्या मोबाईलची निर्मिती अमेरिकेतच केली पाहिजे. इतर देशांमध्ये उत्पादन केल्यास थेट 25 टक्के कर लावला जाईल, असा इशाराच ट्रम्प यांनी दिला. दरम्यान, ट्रम्प तात्यांचा टेरिफ स्ट्राईकचा फटका हिंदुस्थानला बसण्याची शक्यता आहे.

राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी ‘अमेरिका फर्स्ट’ हे धोरण राबवताना इतर देशांच्या उत्पादनांवर मोठे टेरिफ लावण्याची घोषणा केली होती. आता तर पंपन्यांनी हिंदुस्थानात गुंतवणूक करू नये अशा धमक्याच ट्रम्प यांच्याकडून दिल्या जात आहेत. गेल्या आठवडय़ात ट्रम्प यांनी ‘अॅपल’चे सीईओ टीम कुक यांना हिंदुस्थानात पंपनी उभारू नका असे बजावले होते. तसेच ‘आयफोन’चे उत्पादन अमेरिकेतच करावे अन्यथा इतर देशातून आलेल्या आयफोनवर 25 टक्के कर लावला जाईल असे ट्रम्प यांनी बजावले होते.

इतर कंपन्यांनांही अमेरिकेत उत्पादन करण्याचा आग्रह

फक्त अॅपल किंवा सॅमसंग नाही तर इतर मोठ्या कंपन्यांनी अमेरिकेत उत्पादन सुरू करावे यासाठी राष्ट्राध्यक्ष ट्रम्प आग्रही आहेत. यात वाहन उद्योग, औषधे, चीप उत्पादन कंपन्यांचा समावेश आहे.

सॅमसंगला फटका बसणार

दक्षिण कोरियाची सॅमसंग ही मोबाईल उत्पादनात जगातील दुसऱया क्रमांकाची कंपनी आहे. सॅमसंगने 2019 मध्येच चीनमधून मोबाईल उत्पादन बंद केले. सध्या दक्षिण कोरियासह हिंदुस्थान, व्हिएतनाम आणि ब्राझिलमध्ये स्मार्टफोन तयार केले जातात. पण ट्रम्प यांच्या निर्णयाचा फटका सॅमसंगला बसू शकतो.

अमेरिकन नागरिकांनाच आयफोन महागणार

चीनमधील गुंतवणूक कमी करून अॅपलने हिंदुस्थानात उत्पादन वाढविले. हिंदुस्थानात उत्पादन होणारा आयफोन अमेरिकेत 1200 डॉलरपर्यंत मिळतो. मात्र, आयफोनचे उत्पादन अमेरिकेतच झाल्यास ही किंमत 1500 ते 3500 डॉलर्सवर पोहचू शकते. अमेरिकन नागरिकांनाच याचा फटका बसू शकतो असा अंदाज आहे.

अमेरिकेत विकल्या जाणाऱया स्मार्टफोनचे उत्पादन अमेरिकेतच केले पाहिजे. पण हिंदुस्थानसह इतर देशांतून तयार केलेले फोन अमेरिकेत विकणार असाल तर 25 टक्के टेरिफ द्यावा लागेल. अॅपलला जे सांगितले आहे तेच सॅमसंगलाही लागू आहे.