कोविड केअर सेंटरला चुकीच्या पध्दतीने विरोध करु नका; ग्रामस्थांना आवाहन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

दानशूर व्यक्ती, स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून कोविड केअर सेंटरच्या उभारणीचे काम सध्या सुरु आहे. अशावेळी कोविड केअर सेंटरच्या उभारणीला चुकीच्या पध्दतीने विरोध करु नका, असे आवाहन जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष उदय बने यांनी केले आहे. तालुका आरोग्य आधकाऱ्यांनीही कोविड केअर सेंटरचे प्रस्ताव तातडीने जिल्हाधिकार्यांना पाठवावेत. जेणेकरुन बेडचा प्रश्न लवकर सुटेल आणि रुग्णांना तातडीने उपचार देता येतील असे उदय बने यांनी सांगितले.

जि.प.उपाध्यक्ष आणि आरोग्य बांधकाम सभापती उदय बने यांनी आपल्या दोन दिवसीय पाहणी दौर्‍याला संगमेश्वर तालुक्यापासून सुरुवात केली. प्राथमिक आरोग्य केंद्र वांद्री, तालुका संगमेश्वर, ग्रामीण रुग्णालय, संगमेश्वर, प्राथमिक आरोग्य केंद्र सावर्डा ता.चिपळूण, प्राथमिक आरोग्य केंद्र लोटे या केंद्रांची पहिल्या टप्प्यात पाहणी केली. शनिवारी प्राथमिक आरोग्य केंद्र कुंबळे ता़.मंडणगड, प्राथमिक आरोग्य केंद्र पिसई ता़.दापोली, प्राथमिक आरोग्य केंद्र उंबर्ले व दाभोळ प्राथमिक आरोग्य केंद्र चिखली ता.ग़ुहागर या प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या पाहणी दौर्‍यात जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, तालुका आरोग्य अधिकारी, वैद्यकिय अधिकारी सहभागी झाले होते.

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील प्राथमिक आरोग्य केंद्र वांद्री, ता़.संगमेश्वर येथे अत्यावश्यक सुविधा उपलब्ध असून त्यात रुग्णवाहिकेचादेखील समावेश आहे़. रुग्णवाहिकेवर चालकासाठी मागणी करुनही पदभरती करण्यात आलेली नाही. त्यामुळे रुग्णवाहिका आरोग्य केंद्रात उभी आहे. या रुग्णवाहिकेला लवकरात लवकर चालक उपलब्ध करुन द्यावा अशी मागणी ग्रामस्थांनी उदय बने यांच्याकडे केली.