
खरेदी केलेल्या जमिनीच्या सातबारा उताऱ्यावर दस्ताची नोंदणी करून देण्यासाठी 30 हजार रुपये लाचेची मागणी करून 25 हजार रुपये लाच घेताना देशिंगच्या तलाठ्यासह कोतवालाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले आहे. देशिंग (ता. कवठे महांकाळ) येथील तलाठी कार्यालयात सापळा लावून लाचलुचपत विभागाच्या पथकाने ही कारवाई केली.
तलाठी सचिन रघुनाथ पाटील (वय 38, रा. मिरज) आणि कोतवाल आनंद शिवा पाटील (वय 49, रा. देशिंग) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. त्यांच्याविरोधात कवठे महांकाळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तक्रारदारांनी खरेदी केलेल्या जमिनीच्या सातबारा उताऱ्यावर खरेदी दस्ताची नोंद करून देण्यासाठी देशिंग येथील तलाठी कार्यालयात अर्ज केला होता. ही नोंदणी करण्यासाठी तलाठी सचिन पाटील याने 30 हजार रुपये लाचेची मागणी केली होती.
यानंतर तक्रारदाराने सांगलीच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती. दिलेल्या तक्रारीनुसार सोमवारी (दि. 11) पडताळणी केली असता, त्यामध्ये तलाठी सचिन पाटील याने लाचेची मागणी केल्याचे तसेच कोतवाल आनंदा पाटील याने तलाठ्याला लाच देण्यासाठी तक्रारदाराला प्रोत्साहन दिल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर देशिंग येथील तलाठी कार्यालयातच पथकाने सापळा लावला. तलाठी सचिन पाटील याला 25 हजार रुपये लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आले. त्याचबरोबर कोतवाल आनंदा पाटील याचाही या प्रकरणात सहभाग असल्याने त्यालाही ताब्यात घेण्यात आले. या दोघांविरोधात कवठे महांकाळ पोलीस ठाण्यात लाचलुचपत प्रतिबंधक अधिनियमाखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक राजेश बनसोडे, अपर पोलीस अधीक्षक सूरज गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली उपअधीक्षक सुजय घाटगे, अविनाश सागर, संजय संकपाळ, रवींद्र धुमाळ, सलीम मकानदार, राधिका माने, सीमा माने, बाळासाहेब पवार यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे.



























































