
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त देशातून तसेच जगभरातून अनुयायी 6 डिसेंबर रोजी दादर येथील चैत्यभूमी येथे दरवर्षी अभिवादनासाठी उपस्थित राहतात.
यावर्षी कोरोनाचा संसर्ग पसरू नये यासाठी खबरदारी म्हणून केवळ शासकीय मानवंदना देण्याच्या समन्वय समितीच्या प्रस्तावाचा सकारात्मक विचार करण्यात यावा. अभिवादन सोहळा, हॅलिकॉप्टरद्वारे पुष्पवृष्टी, अभिवादन कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण आणि सर्व समाजमाध्यमांतून ऑनलाईन प्रक्षेपण करण्यात यावे, अशा सूचना विधानसभाध्यक्ष नाना पटोले यांनी दिल्या असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली निर्णय घेऊन शासन निर्णय जारी करण्यात यावेत असे सुचविले आहे.
भारतरत्न परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 64 व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त शासनाच्यावतीने करावयाच्या सेवा-सुविधांबाबत तसेच मार्गदर्शक सूचना निर्गमित करण्यासंदर्भात आज विधानभवन येथे उच्चस्तरीय बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी विधानसभा अध्यक्ष नाना पटोले बोलत होते.
बैठकीस सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचे मंत्री धनंजय मुंडे, खासदार राहुल शेवाळे, नगर विकास विभागाचे प्रधान सचिव महेश पाठक, सामाजिक न्याय विभागाचे प्रधान सचिव श्याम तागडे, बेस्टचे सुरेंद्र बागडे, मुंबई महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त संजीव जयस्वाल, प्रधान सचिव विनित अग्रवाल, मुंबई शहर जिल्हाधिकारी राजीव निवतकर, सह पोलिस आयुक्त कायदा व सुव्यवस्था विश्वास नांगरे पाटील, डॉ बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन समन्वय समितीचे सरचिटणीस नागसेन कांबळे,मयुर कांबळे, सदानंद मोहिते, चंद्रशेखर कांबळे, सुबोध भारत आदीसह पदाधिकारी उपस्थित होते.
सोशल मीडियावरही ऑनलाइन प्रसारण
डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनानिमित्त दरवर्षी महानगरपालिका व शासनामार्फत अनुयायांसाठी योग्य व्यवस्थापन करण्यात येते. मात्र, यंदा कोरोना महामारीच्या काळात संसंर्ग पसरू नये यासाठी अनुयायांच्या भावना समजून शासकीय मानवंदना आणि हॅलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी करण्याच्या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण करण्यात येईल, जेणेकरून गावपातळीपासून ते जागतिक पातळीपर्यंत प्रत्येक अनुयायाला ऑनलाईन स्वरूपात अभिवादन कार्यक्रम पाहता येईल.
विविध समाजमाध्यमांद्वारे ऑनलाईन प्रसारणही करण्यात येईल, यासाठी शासन स्तरावर सकारात्मक निर्णय घेण्यात येईल, असे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी यावेळी स्पष्ट केले.
























































