
पुण्यात पंडित द. वि. काणेबुवा प्रतिष्ठानने भारतरत्न पंडित भीमसेन जोशी यांच्या जन्मशताब्दीनिमित्त 100 हून अधिक कलाकारांना घेऊन ‘खयाल यज्ञ’ हा कार्यक्रम सादर करण्यात आला. त्याच धर्तीवर सरकारच्या संयुक्त विद्यमाने असे कार्यक्रम साजरे करता येतील का, याबाबत सांस्कृतिक कार्यक्रम विभागाने पुढाकार घ्यावा. कोरोना असल्याने समाजमाध्यमांवरुन या कार्यक्रमाचे लाईव्ह स्ट्रिमिंग कसे करण्यात याचेही नियोजन करावे. सरकार आणि जनतेच्या सहभागातून हा कार्यक्रम साजरा व्हावा, अशा सूचना उपसभापती नीलम गोऱहे यांनी आज सांस्कृतिक कार्य विभागाला दिल्या.
विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ.नीलम गोऱहे यांच्या अध्यक्षतेखाली आणि सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख यांच्या प्रमख उपस्थितीत आज भारतरत्न पंडित भीमसेन जोशी यांच्या जन्मशताब्दीनिमित्त सांस्कृतिक कार्यक्रम करण्यासंदर्भातील बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी नीलम गोऱहे म्हणाल्या, पंडित जोशींच्या जन्मशताब्दी वर्षांच्या कार्यक्रमाच्या आयोजनासाठी शासनाने हा दोन कोटींचा निधी उपलब्ध करून देण्याबाबत मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे, उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजितदादा पवार यांच्याकडे पाठपुरावा करण्यात येईल.
महाराष्ट्रभर सांस्कृतिक कार्यक्रम – अमित देशमुख
भारतरत्न पंडित भीमसेन जोशी यांच्या जन्मशताब्दी वर्षाला 4 फेब्रुवारी 2021 रोजीपासून सुरुवात झाली असून वर्षभर विविध कार्यक्रमांद्वारे त्यांना मानवंदना देण्यात येणार आहे. तसेच या जन्मशताब्दीनिमित्त महाराष्ट्रभर विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे.


























































