
वाहनचालकांना वाहन चालक परवाना देताना त्यांच्याकडून घेतले जाणारे वैद्यकीय तपासणी प्रमाणपत्र अनेक वेळा बेकायदेशीरपणे वाटप केलेले असते. त्यामुळे दृष्टीदोष असलेल्या वाहनचालकांनाही परवाना मिळण्याची शक्यता असते. यासाठी वाहनचालकांची वैद्यकीय तपासणी अॅपद्वारे ऑनलाईन पद्धतीने करण्यासाठी परिवहन विभाग नॅशनल इन्फॉरमेटिक्स सेंटरला (एनआयसी) प्रस्ताव पाठविणार आहे.
केंद्र सरकारच्या निर्देशानुसार 32व्या राष्ट्रीय सुरक्षा अभियानाचे आयोजन 18 जानेवारी ते 17 फेब्रुवारी दरम्यान राज्यभर करण्यात येणार आहे. यासंदर्भात माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत परिवहन आयुक्त अविनाश ढाकणे यांनी अनेक योजनांची माहिती दिली. ते पुढे म्हणाले, सध्या वाहन परवाना देताना एमबीबीएस डॉक्टरांचे वैद्यकीय प्रमाणपत्र ग्राह्य धरले जाते. परंतु त्यात बोगस प्रमाणपत्र मिळण्याची शक्यता असते. त्यामुळे आम्ही एनआयसीला एक प्रस्ताव पाठविला आहे.
यात परिवहन विभागामार्फत तज्ञ डॉक्टरांची नेमणूक करण्याची योजना आहे. अशा डॉक्टरांसाठी मोबाईल अॅप तयार केले जाईल. त्याचा लॉगीन आयडी या डॉक्टरांना दिला जाईल. त्यात जीआय टॅग तंत्रज्ञान वापरले जाईल. त्यामुळे जुना फोटो अपलोड होणारच नाही आणि आरटीओला ऑनलाईन सर्टीफिकेट्स प्राप्त होईल असेही त्यांनी स्पष्ट केले.
मालवाहतूक वाहनांनाही व्हेईकल ट्रपिंग सिस्टम
यानिमित्ताने वाहन परवान्यासाठी नागरिक प्रत्यक्ष डॉक्टरांना भेटतील आणि वैद्यकीय प्रमाणपत्रातील हेराफेरी नष्ट होईल. सध्या दिली जाणारी वैद्यकीय प्रमाणपत्रे खरी की खोटी हे तपासणारी कोणतीही यंत्रणा अस्तित्वात नसल्याचेही अविनाश ढाकणे यांनी सांगितले.
राज्यातील माल वाहतूक करणाऱया अवजड वाहनांनाही व्हेईकल ट्रपिंग सिस्टीम बसविण्याचा प्रस्ताव असल्याचेही त्यांनी सांगितले. सध्या नव्या गाडय़ांमध्ये जीपीआरएस तसेच व्हेईकल ट्रपिंग सिस्टीम यंत्रणा गाडी उत्पादन करतानाच बसविलेली असते. जुन्या खाजगी वाहनांना व्हेईकल ट्रपिंग सिस्टीम बसविण्याचाही विचार आहे.
मालवाहतूक करणाऱया वाहनांना व्हेईकल ट्रपिंग सिस्टीम बसविल्याने वाहनांद्वारे लेनचे पालन न करणे तसेच वेगाने वाहन चालविण्याच्या प्रकारांना आळा बसेल, असे ढाकणे यांनी सांगितले.
























































