14 टक्के पाऊस, 26 टक्के पेरण्या! दुष्काळाच्या संकटाने शेतकरी धास्तावला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

देविदास त्र्यंबके, संभाजीनगर

राज्यात सर्वत्र मुसळधार पाऊस सुरू असताना मराठवाडय़ात मात्र भुरभुरच सुरू आहे. महिना उलटला तरी 76 पैकी 41 तालुक्यांत पावसाने हजेरी लावलेली नाही. आठ जिल्हय़ांत आतापर्यंत फक्त 14 टक्के पाऊस झाला असून 26 टक्केच पेरणी झाली आहे. गेल्या वर्षी पाऊस नसतानाही जूनअखेरपर्यंत मराठवाडय़ात 80 टक्के पेरणी झाली होती. यंदा पाऊसच नसल्यामुळे शिवार अजून गजबजलेच नाही. दुष्काळाचे कोरडे ढग घोंगावत असल्यामुळे शेतकरी धास्तावला आहे.

मराठवाडय़ातील शेतकरी गेल्या पाच वर्षांपासून दुष्काळाशी सामना करत आहे. यंदा हवामान खात्याने चांगल्या पावसाचा होरा दिल्यामुळे शेतकरी सुखावला. पण एकदा, दोनदा जुजबी हजेरी लावून पावसाने नेहमीप्रमाणे मराठवाडय़ाकडे पाठ फिरवली आहे. पावसाळा सुरू होऊन दीड महिना उलटला तरी मराठवाडय़ाचे डोळे आभाळाकडेच टक लावून आहेत. विभागात आतापर्यंत वार्षिक सरासरीच्या केवळ 14 टक्के पाऊस पडला आहे.
पाऊसच नसल्यामुळे पेरण्याही रखडल्या आहेत. विभागात आतापर्यंत केवळ 26 टक्के पेरणी झाली असून त्यात खरीप ज्वारी, मूग, उडीद, तूर, सोयाबीन, कापूस, मका, सूर्यफुलाचा समावेश आहे. पहिल्या पावसाच्या भरवशावर पेरण्यात आलेली ही पिके सध्या उगवणीच्या अवस्थेत असून पाऊस पडला नाही तर कोंब सुकण्याची शक्यता आहे.

12 तालुक्यांत भीषण परिस्थिती
मराठवाडय़ातील 12 तालुक्यांमध्ये पावसाअभावी भयंकर परिस्थिती आहे. सेलू, वसमत, नांदेड, लोहा, किनवट, देगलूर, बिलोली, धर्माबाद, हिमायतनगर, गेवराई, अंबाजोगाई, केज, धारूर, वडवणी, औसा, चाकूर या तालुक्यांमध्ये अद्याप 10 टक्केही पाऊस झालेला नाही. त्यामुळे या भागात पाण्याबरोबरच जनावरांच्या चाऱयाचाही गंभीर प्रश्न उभा राहिला आहे.

पेरणीचा टक्का घसरला
लातूर विभागात गतवर्षी चांगला पाऊस झाला होता. त्यामुळे पेरणी 90 टक्के झाली होती. उर्वरित मराठवाडय़ात पाऊस नसतानाही जुलैच्या मध्यापर्यंत पेरणी आटोपत आली होती. यावर्षी पाऊसच नसल्यामुळे लातूर विभागात केवळ 19 टक्के पेरणी झाली असून, आठवडाभरात पाऊस पडला तरच खरीपाच्या पेरणीचा टक्का वाढू शकतो, असे विभागीय कृषी सहसंचालक टी. एन. जगताप यांनी सांगितले.

मराठवाडय़ातील जिह्यात पाऊस व पेरणी टक्केवारी
जिल्हा         पाऊस       पेरणी सरासरी टक्के
संभाजीनगर   19.8             51
जालना        17.4             32
बीड           12.7             33
परभणी       12.7              31
हिंगोली       12.8              11
नांदेड         10.4              25
लातूर         13.0              09
धाराशीव     13.8             12