
सामना प्रतिनिधी, बीड
भीषण दुष्काळातून वाटचाल करणाऱ्या जिल्ह्यात प्रकल्पीय पाणीसाठा ही कमालीचा घटला आहे. गोदावरी आणि कृष्णा खोऱ्याअंतर्गतच्या 144 पैकी 82 प्रकल्प पूर्णत: आटले आहेत. आजमितीला जिल्ह्यात केवळ 1.39 टक्के (12.931 द.ल.घ.मी.) इतकाच पाणीसाठा शिल्लक आहे. दुसरीकडे जिल्ह्यातील 6 लाख 98 हजार 411 इतक्या जनतेची तहान भागवण्यासाठी जिल्हा प्रशासनाने 501 टँकर सुरू केले आहेत. अल्प पाणीसाठा लक्षात घेता टँकरची संख्या दिवसेंदिवस वाढतच जाणार आहे.
जिल्ह्यात माजलगाव आणि केज तालुक्यातील मांजरा या दोन प्रकल्पासह 16 मध्यम आणि 126 लघु असे एकूण 144 प्रकल्प आहेत. माजलगाव प्रकल्पात सध्या केवळ 97.200 द.ल.घ.मी.इतका मृत पाणीसाठा शिल्लक आहे. तर मांजरामध्ये केवळ 25.5185 द.ल.घ.मी.पाणीसाठा आहे. गोदावरी खोऱ्यातील दहा व कृष्णा खोऱ्यातील सहा मध्यम प्रकल्पामध्ये 6.124 द.ल.घ.मी.पाणीसाठा आहे तर गोदावरी खोऱ्यातील 99 लघु प्रकल्प व कृष्णा खोऱ्यातील 27 लघु प्रकल्पामधील 6.193 द.ल.घ.मी.इतकेच पाणी शिल्लक राहिले आहे.
लाभ क्षेत्र विकास प्राधिकरण, जायकवाडी पाटबंधारे विभाग (3) कडून दर गुरूवारी पाणीसाठा मोजला जातो. त्यात कालच्या गुरूवारी (दि.7) जिल्ह्यातील 82 लघु व मध्यम प्रकल्प कोरडे पडल्याचे स्पष्ट झाले आहे तर माजलगाव, मांजरा या दोन मोठ्या प्रकल्पासह चार मध्यम व 42 लघु अशा एकुण 46 प्रकल्पांचा पाणीसाठा जोत्याखाली गेला आहे. 10 प्रकल्पामध्ये 25 टक्केपेक्षा कमी तर 5 लघु प्रकल्पांमध्ये 25 ते 50 टक्के पाणीसाठा आहे तर केवळ एका लघु प्रकल्पात 50 ते 75 टक्के पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. जिल्ह्यातील जनतेची तहान भागवण्यासाठी जिल्ह्यात 501 टँकर सुरू करण्यात आले आहे.
























































