हरियाणात खाण माफियांकडून पोलीस उपअधीक्षकांची ट्रकखाली चिरडून हत्या

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अवैध उत्खननावर कारवाई करण्यासाठी गेलेल्या पोलीस उपअधीक्षकांची खाण माफियांनी ट्रकखाली चिरडून हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर येत आहे. हरियाणा राज्यातील मेवातमध्ये ही घटना घडली आहे. पोलीस उपअधीक्षक सुरिंदर सिंग यांची तवाडू, नूह येथे नियुक्ती करण्यात आली होती. मंगळवारी सुरिंदर सिंह खाण माफियांवर कारवाई करण्यासाठी गेले होते. यादरम्यान त्यांनी दगडांनी भरलेला डंपर थांबवण्याचा प्रयत्न केला. मात्र चालकाने डंपर थेट सिंह यांच्या अंगावर घातला. यात त्यांचा जागीच मृत्यू झाला.

सुरिंदर सिंग याच वर्षी सेवेतून निवृत्त होणार होते. दरम्यान हरयाणातील पाचगावच्या डोंगरात सिंग यांचा मृतदेह सापडला आहे. आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून शोधमोहीम सुरू आहे. या घटनेनंतर पोलिसांचा मोठा फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला आहे. पोलीस उपअधीक्षकांच्या हत्येनंतर राज्य सरकारही सक्रिय झाले असून, गुन्हेगारांना पकडण्याची कारवाई तीव्र करण्यात आली आहे. एकाही गुन्हेगाराला सोडले जाणार नाही असे पोलिसांनी ट्विट केले आहे.