फॉर्मेलिनच्या धास्तीने मासळी बाजार पडू लागले ओस

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन, पणजी
मडगाव येथील घाउक मासळी बाजारात येणाऱ्या मासळी मध्ये फॉर्मेलिन असण्याची शक्यता गृहीत धरून अन्न आणि औषध प्रशासनाने नुकत्याच टाकलेल्या धाडी टाकल्या होत्या. नंतर राजकीय दबाव आल्याने एफडीएने आपला अहवाल बदलला असावा अशी शंकेची पाल मनात चूकचुकत असल्याने गोवेकरांनी मासळी खरेदी कडे पाठ फिरवली आहे. त्यामुळे मासळी बाजार सध्या ओस पडू लागले आहेत.

गोवेकरांचे मत्स्य प्रेम जग जाहिर आहे. मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर हे तर अनेकदा आपण संरक्षण मंत्री असताना गोव्यात मासे खायला आवर्जून येत असे सांगायचे. मासे हा गोमंतकीयांच्या आहारातील महत्वपूर्ण घटक आहे. मात्र फॉर्मेलिन प्रकरण उघड़किस आल्यानंतर सरकार आणि संबंधित यंत्रणेने केलेला खुलासा पचनी पडत नसल्याने लोकांनी मासे खाणे कमी केले आहे. त्यामुळे राज्यातील मासळी बाजार ओस पडू लागले आहेत.

एफडीएने मडगाव येथील घाऊक मासळी बाजारावर टाकलेल्या धाडीवेळी सकाळी माशांवर फॉर्मेलिन असल्याचे घटनास्थळी असलेल्या अधिकाऱ्यांनी सांगितले होते. त्यानंतर संतप्त मासळी विक्रेत्यांनी मडगाव, पणजी आणि म्हापसा येथील मासळी बाजार बंद ठेवून एफडीएच्या कारवाईचा निषेध केला होता. मासळी विक्रेत्यांच्या संघटनेने कृषीमंत्री विजय सरदेसाई यांच्या समोर गाऱ्हाणे घातल्या नंतर सकाळी पोझिटीव्ह असलेला अहवाल सायंकाळी निगेटिव्ह बनला होता. अचानक झालेल्या बदला मुळे फॉर्मेलिनची धास्ती घेतलेल्या गोमंतकीय मत्स्यप्रेमींनी मासळी ऐवजी मटण आणि चिकन कडे आपला मोर्चा वळवला आहे. गोव्यात सध्या मासेमारी बंदी आहे. १ ऑगस्ट पासून मासेमारी सुरु होणार असून दरम्यानच्या काळात आंध्रप्रदेश, ओडिशा, कर्नाटक आदि ठिकाणहुन मासळी आयात करावी लागते. मासळी टिकून रहावी म्हणून फॉर्मेलिनचा वापर केला जातो. फॉर्मेलिन शरीरात गेले तर कॅन्सर होऊ शकतो अशा बातम्या व्हायरल झाल्या पासून मत्स्य प्रेमी धास्तावले आहेत.

सरकारने एफडीएवर दबाव आणून अहवाल दडपले असा आरोप विरोधी पक्ष काँग्रेस कडून केला जात आहे. सरकारने धाड टाकलेल्या दिवशीचे सकाळ आणि संध्याकाळचे अहवाल जाहिर करावे अशी मागणी काँग्रेसने केली होती. त्यानुसार सरकारने काल रात्री दोन्ही अहवाल सरकारी संकेत स्थळावरून जाहीर कले. त्याने समाधान न झालेल्या काँग्रेस कार्यकर्त्यांनी आज एफडीएच्या अधिकाऱ्यांना घेराव घालून जाब विचारला.

शिवसेनेने याची गंभीर दखल घेत फार्तोडा पोलिस स्थानकात अज्ञाता विरोधात पोलिस तक्रार दाखल केली आहे. विरोधकांचा दबाव वाढू लगताच मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांनी लक्ष घालून असले प्रकार आढळले तर कडक कारवाई करण्याचे निर्देश दिले. आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांनी गरज पडली तर बाहेरुन येणाऱ्या मासळीवर बंदी घातली जाईल असेही स्पष्ट केले आहे. उलट सुलट प्रतिक्रियांमुळे संभ्रमीत झालेल्या गोवेकरांनी बाहेरुन येणारी मासळी खाऊन धोका पत्करण्याऐवजी ताज्या मासळीसाठी १ ऑगस्ट पर्यंत प्रतीक्षा करणे पसंत केले आहे. लोक सध्या मानशी आणि गरवणीच्या माशांकडे वळत असले तरी त्यांचे दर परवडणारे नाहीत.