अपुऱ्या कर्मचाऱ्यांमुळे जे. जे. रुग्णालयातील डॉक्टरांवर ताण

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

तुमच्या भागातील सरकारी रुग्णालयांमध्ये जाऊन तेथील परिस्थिती जाणून घ्या, औषधे व अन्य आवश्यक साधनांचा पुरवठा व्यवस्थित होतो का याबाबत माहिती घ्या, असे आवाहन शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांना केले होते. उद्धव ठाकरे यांच्या आवाहनानंतर शिव आरोग्य सेनेने आज जे. जे. रुग्णालयात धडक दिली. अपुऱ्या कर्मचाऱ्यांमुळे जे.जे. रुग्णालयातील डॉक्टरांवर ताण वाढत असल्याचे या पाहणीत निदर्शनास आले.

शिवसेना नेते, खासदार अरविंद सावंत, शिव आरोग्य सेनेचे कार्याध्यक्ष डॉ. किशोर ठाणेकर, महाराष्ट्र समन्वयक जितेंद्र सकपाळ यांच्या मार्गदर्शनाने शिव आरोग्य सेनेचे पदाधिकारी सर्व सरकारी रुग्णालयांचा आढावा घेऊन त्यांना भेडवसावणाऱया समस्या जाणून घेत आहेत. जे.जे. रुग्णालयात जीवनावश्यक औषधांचा पुरवठा नियमितपणे होतोय. रुग्णालयातील 2 एमआरआय मशीन, 3 सीटी स्पॅन मशीन, एक्स रे मशीन सुस्थितीत आहे. परंतु मशीन हाताळण्यासाठी 377 तज्ञ मंजूर झालेले असताना देखील त्यातील 143 पदे रिक्त आहेत. वर्ग 1 आणि वर्ग 2 श्रेणीतील 210 डॉक्टरांची आवश्यकता असताना 144 डॉक्टरांची पदे रिक्त आहेत. वर्ग 4 श्रेणीतील साफसफाई, कक्ष सेवक, लॅब अटेंडंट, शिपाई व इतर 809 मंजूर पदांपैकी 294 पदे अद्याप रिक्त आहेत. शिव आरोग्य सेना आणि जे. जे. रुग्णालय प्रशासन यांच्या संयुक्त बैठकीत हा खुलासा झाला आहे.

शिव आरोग्य सेनेचे मलबार हिल समन्वयक मिलिंद वेदपाठक यांच्यासह नीलेश चव्हाण तसेच आम्ही गिरगावकर संस्थेचे कार्यकारिणी सदस्य दीपक राजपुरकर, हितेंद्र दांडेकर, संतोष खांडेकर उपस्थित होते. रुग्णालय प्रशासनातर्फे डॉ. संजय सुरासे, उप अधिष्ठाता बालरोग तज्ञ डॉ. वळवी, डॉ. नागर, डॉ. बडोले, डॉ. तांबोळी, डॉ. शामल, प्रशासकीय अधिकारी गोसावी, बांधकाम विभागाचे शिंधाडे, वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी डॉ. राठोड, मेट्रन माने मॅडम या बैठकीला उपस्थित होत्या.

रिक्त पदे लवकरात लवकर भरा

जे. जे. रुग्णालयात वर्षाला सुमारे 10 लाखांहून अधिक रुग्ण उपचारासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱयातून येतात. त्यामुळे रिक्त पदांची लवकरात लवकर भरती केल्यास डॉक्टर, परिचारिका आणि इतर कर्मचारी वर्गावर येणारा अतिरिक्त भार कमी होण्यास मदत होईल, अशी आशा तेथील डॉक्टरांनी व्यक्त केली. रुग्णालयात सध्या व्हेंटिलेटरची नितांत गरज भासत असल्याचेही त्यांनी नमूद केले.