
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षामुळे वांद्रे येथील शासकीय वसाहतीच्या पुनर्विकासाला गती मिळू लागली आहे. या वसाहतीमध्ये उपलब्ध असलेल्या झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाच्या जागेची क्षमता तपासून त्याठिकाणी पुनर्विकास करण्यासाठी सविस्तर आराखडा सादर करण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज दिले.
वांद्रे (पूर्व) शासकीय वसाहतीमध्ये राहणाऱया अधिकारी आणि कर्मचाऱयांना मालकी हक्काची घरे देण्यासंदर्भातील मुद्दय़ावर आज मंत्रालयात बैठक आयोजित करण्यात आली होती. मुख्यमंत्री शिंदे यांनी याप्रसंगी उपस्थित शिष्टमंडळाशी संवाद साधून वसाहतीतील सोयीसुविधांची संपूर्ण माहिती घेतली. पुनर्विकासाबाबत सविस्तर आराखडा प्राप्त झाल्यानंतर पुढील निर्णय घेण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.
वांद्रे (पूर्व) येथे सुमारे 90 एकर क्षेत्रफळ भूखंडावर शासकीय वसाहत उभी असून 1958 ते 1973 च्या दरम्यान या वसाहतीचे बांधकाम करण्यात आले आहे. राज्य शासनाच्या प्रथम वर्ग ते चतुर्थ श्रेणी अधिकारी-कर्मचाऱयांसाठी 4 हजार 782 सदनिका आहेत. यापैकी 169 इमारती धोकादायक असून त्यातील 68 अतिधोकादायक आहेत, उर्वरित 101 इमारती रिकाम्या करण्यात येणार असून तेथील कर्मचाऱयांना लॉटरी पद्धतीने सेवा निवासस्थाने देण्यात येणार आहेत. या वसाहतीमध्ये 12 इमारतींचे बांधकाम प्रगतिपथावर असून त्यापैकी 4 इमारतींचे बांधकाम पूर्ण झाले आहे.
























































