मुद्दा – जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थी करणार अमेरिका वारी! 

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पूर्वी शिक्षणापासून कोणी वंचित राहू नये म्हणून गावागावात जिल्हा परिषदेच्या शाळा सुरु करण्यात आल्या होत्या. गेल्या काही वर्षांमध्ये खासगी शाळांचे वर्चस्व वाढल्यामुळे ग्रामीण भागातील जिल्हा परिषद शाळा मागे पडू लागल्या. पटसंख्येअभावी अनेक जिल्हा परिषद शाळा बंद पडल्या आहेत. पालकांचा आपली मुले इंग्रजी माध्यमाच्या शाळेत किंवा खासगी शाळेत शिकवण्याकडे कल वाढला आहे. अशावेळी जिल्हा परिषद शाळांचे महत्व कमी होत असताना रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या विद्यार्थ्यांना थेट अमेरिका वारी घडवण्याची योजना आखली आहे. जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थी हे अमेरिकेला जाऊन नासा या अंतराळ संशोधन केंद्राला भेट देणार आहेत. जिल्हा परिषद शिक्षण विभागाच्या या योजनेमुळे अचानक जिल्हा परिषद शाळांचे महत्व वाढले. विद्यार्थ्यांमध्ये विज्ञान आणि संशोधनाची आवड निर्माण व्हावी या उददेशाने जिल्हा परिषदेने जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांसाठी नासा आणि इस्त्रो अंतराळ केंद्रांना भेट देण्याची योजना आखली. त्याकरीता जिल्हा परिषदेने चाळणी परीक्षा घेतली. ही परीक्षा चार टप्प्याने झाली. 26 हजार 872 विद्यार्थ्यांमधून 27 विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली. पहिली परीक्षा केंद्रस्तरावर घेण्यात आली. त्या परीक्षेला 26 हजार 872 विद्यार्थी बसले. त्यातून 2600 विद्यार्थ्यांची बीटस्तरावरील परीक्षेसाठी निवड झाली. बीटस्तरावरील परीक्षेतून 600 विद्यार्थ्यांची तालुकास्तरावरील परीक्षेसाठी निवड झाली. 600 विद्यार्थ्यांमधून जिल्हास्तरीय परीक्षेसाठी 90 विद्यार्थी निवडले गेले आणि अंतिम जिल्हास्तरीय आणि मुलाखतीच्या परीक्षेतून 27 जणांची निवड करण्यात आली. ‘जाणू विज्ञान अनुभवू विज्ञान’ या योजनेंतर्गत इयत्ता पाचवी ते सातवीतील विद्यार्थ्यांना अमेरिकेतील नासा अंतराळ संशोधन केंद्राला भेट देण्याची संधी मिळणार आहे. निवडलेल्या 27 विद्यार्थ्यांपैकी 9 विद्यार्थी हे नासा अंतराळ संशोधन केंद्राला भेट देतील. आणि सर्व विद्यार्थी इस्त्रो अंतराळ संशोधन केंद्राला भेट देणार आहेत. या योजनेसाठी जिल्हा नियोजनमधून निधी खर्च करण्यात येणार आहे. ग्रामीण भागातील जिल्हा परिषद शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना ही एक सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे.

>> दुर्गेश आखाडे