संताप! संताप! संताप!! उलट तपासणीवेळी दीपक केसरकरांचे शिवसेनाप्रमुखांवर आरोप, मिंधे गटाचं बाळासाहेबांवरचं बनावट प्रेम उघड, उद्धव ठाकरेंनी घेतला समाचार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

नागपूर येथे विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन सुरू आहे. या अधिवेशसाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे नागपुरात उपस्थित आहेत. यादरम्यान अपात्रतेच्या संदर्भात सुनावणी सुरू आहे. उलट तपासणीवेळी मिंधे गटाच्या आमदारांचं हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यावरील बनावट प्रेम उघडं पडलं आहे. पक्षाशी गद्दारी करून मिंधे गटासोबत गेलेले सध्याचे शालेय शिक्षण दीपक केसरकर यांनी शिवसेनाप्रमुखांवर आरोप केले. हे संतापजनक असल्याचं उद्धव ठाकरे म्हणाले. तसेच पक्षाचे नेते अनिल परब यांनी उलट तपासणीवेळी दीपक केसरकर यांनी काय आरोप केले ते सगळ्यांसमोर आणले. दीपक केसरकरांच्या या आरोपांनंतर राज्याच्या कानाकोपऱ्यातून संताप व्यक्त होत आहे.

‘आमदारांच्या अपात्रतेच्या संदर्भात सुनावणी सुरू आहे. यात शिवसेना पक्षांतर्गत निवडणुका कधी झाल्या याचा सर्व रेकॉर्ड आमच्याकडे आहे. सगळा रेकॉर्ड आमच्याकडे आहे’, असं उद्धव ठाकरेंनी सांगितलं. त्याचवेळी पक्षाचे नेते अनिल परब यांनी उलट तपासणीवेळी दीपक केसरकर यांनी शिवसेनाप्रमुखांवर केलेल्या आरोपांचा समाचार घेतला. शिवसेनाप्रमुखांवरचं मिंधे गटाच्या आमदारांचं बनावट प्रेम त्यांनी जगासमोर आणलं.

‘आज सकाळी सुनावणी झाली. उलट तपासणी झाली तेव्हा शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याबद्दल जे उद्गार काढले हे अत्यंत संतापजनक होते. बाळासाहेबांचे विचार घेऊन आम्ही पुढे जातो आहोत असं सांगत त्यांनी गद्दारी केली आणि आता उलट तपासणीवेळी त्यांनी हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेबांवर बेछूट आरोप केले आहेत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब असताना पक्षात लोकशाही पद्धतीनं निवडणूक आयोगाच्या नियमांप्रमाणे निवडणुका घेतल्या नाहीत, बाळासाहेब मनमानी करत होते, लोकशाही तत्त्व मानत नव्हते, असे आरोप त्यांनी केले. बाळासाहेबांचं निधन झालं 2012 रोजी, दीपक केसरकर हे 2014 रोजी शिवसेनेत आले आणि ते आज बाळासाहेबांच्याबद्दल आम्हाला शिकवून गेले आणि आज त्यांचं खरं स्वरुप उघडकीला आलं आहे. त्यांनी बाळासाहेबांबद्दल जे उद्गार काढले, ते लक्षात घेता त्यांचं बाळासाहेबांबद्दलचं प्रेम बनावट आहे. त्यांना बाळासाहेबांबद्दल कोणतंही प्रेम नाही, स्वत:च्या स्वार्थासाठी ते गेले हे आता सिद्ध होत आहे’, असं अनिल परब म्हणाले.

‘आम्ही पक्षांतर्गत निवडणुकांशी संबंधित सर्व कागदपत्र सादर केले आहेत. मुळात ते शालेय शिक्षणमंत्री असले तरी त्यांचं शिक्षण झालेलं नव्हतं, मूलभूत शिक्षण झालेलं नव्हतं’, अशा शब्दात उद्धव ठाकरे यांनी टीकास्त्र सोडलं. ‘बाळासाहेब ठाकरे असताना हे शिवसेनेच्या विरोधात लढले होते, मग आज यांना काय साक्षात्कार झाला?’, असा खणखणीत सवाल उद्धव ठाकरे यांनी केला.

‘भुजबळांना अशी कोणती जडीबुटी भेटली, कोणता साधुबाबा भेटला की त्याच्याविरोधातील ईडी मागे झाली आणि ईडीने सांगितलं की आम्ही कशासाठी केस केली होती, तेच माहीत नाही. ही जडीबुटी देवा सगळ्यांना दे अशी प्रार्थना’, असं म्हणत त्यांनी टोला लगावला.

31 तारखेला निर्णय काय येईल या प्रश्नावर बोलतांना उद्धव ठाकरे थेट म्हणाले की, ‘वरून’ काय निर्णय येईल तो येईल’.

‘वाटेल तेव्हा वाटेल त्याला बदनाम करायचं त्यांच्या अखत्यारित आल्यानंतर त्यांच्यावरच्या केस मागे घ्यायच्या. एवढं उघड उघड हे थोतांड सुरू आहे. हे थोतांडं मी हिंदुत्व मानायला तयार नाही’, असं म्हणत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपवर शरसंधान केलं. विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनासाठी नागपुरात उपस्थित असताना उद्धव ठाकरे यांनी पत्रकारांच्या प्रश्नांना सडेतोड उत्तरं दिली.

राम मंदिराच्या उद्घाटनासंदर्भात बोलताना, ‘आम्ही राम मंदिरासाठी पक्षनिधी दिला आहेच. प्रभु श्रीराम ही काही एका पक्षाची मक्तेदारी नाही. जे तिकडे उद्घाटन करताहेत ते केवळ नशिब आहे म्हणून उद्घाटन करत आहे. पण बाबरी पाडण्यात यांचा सहभाग नव्हता. त्यानंतर 92 – 93 च्या हिंसाचारात मुंबई वाचवण्यात यांचा सहभाग नव्हता. राम मंदिरसाठी विशेष कायदा बनवा असं मी सांगत होतो. ज्यावेळी राममंदिराचा विषय थंड बस्त्यात होता त्यावेळी मी 2018 मध्ये मी अयोध्येत गेलो होतो. योगायोगानं वर्षभरात सर्वोच्च न्यायालयानं निकाल दिला. त्यानंतर नोव्हेंबरमध्ये मी मुख्यमंत्री झालो, त्यानंतर मी मुख्यमंत्री म्हणून तिकडे गेलो होतो. त्यामुळे मला कुणाचं आमंत्रण आलं तरी मी तिकडे जाईन असं नाही. श्रीराम माझे सुद्धा आहेत. मला श्रीराम सांगतिल तेव्हा मी जाईल’, असं उद्धव ठाकरेंनी स्पष्ट शब्दात सांगितलं.