सर गेले…

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> द्वारकानाथ संझगिरी

मनोहर जोशी सर गेले. ते महाराष्ट्राचे एकमेव मुख्यमंत्री होते, ज्यांच्याकडे मी हक्काने कामासाठी जाऊ शकत होतो. एरव्ही पदावराच्या सर्वपक्षीय नेत्यांपासून मी दूर राहिलो. स्वतःचं काम घेऊन मी त्यांच्याकडे कधीही गेलो नाही. मी इतरांचीच कामं घेऊन गेलो.

राजकीय मंडळींनी क्रिकेटमध्ये लुडबुड करणं मला कधीच आवडलं नाही. कारण फारच थोडी राजकीय मंडळी क्रिकेटवर अस्सल प्रेम करणारी असतात. इतरांना त्या पदाचं वलय हवं असतं, मिरवणं हवं असतं. अलीकडे तर राजकीय नेत्यांनी क्रिकेट असोसिएशन ताब्यात घेतली आहेत. क्रिकेटपटू त्यांची प्यादी असतात. अर्थात राजकीय नेत्यांमुळे आपल्या देशात काही कामं पटकन होतात. काहींमुळे क्रिकेटपटूंचं भलं झालंय. नाही असं नाही, पण बऱ्याचदा क्रिकेटविषयक निर्णय राजकीय दृष्टिकोनातून घेतले जातात हे स्पष्ट दिसतं आणि लाचार क्रिकेटपटू हाताला हात लावून मम म्हणतात. त्यामुळे मनोहर जोशी ज्या वेळी मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या निवडणुकीला उभे राहिले तेव्हा मी त्यांच्या गटाविरुद्ध लिखाण केलं, पण त्यांनी कधी मनात राग ठेवला नाही. ते निवडून आले आणि त्यानंतर त्या रस्त्यावरची राजकीय वर्दळ एवढी वाढली की, क्रिकेटपटू दुय्यम नागरिक झाले. ज्या वाडेकर, वेंगसरकर, संदीप पाटीलने मुंबई क्रिकेट गाजवलं तेसुद्धा त्यांच्या ताकदीसमोर कोसळले. मला तीन गोष्टी पटकन आठवतात. ते मुख्यमंत्री असताना त्यांच्या मतदारसंघातला स्वातंत्र्यवीर सावरकर मार्ग मुंबई पालिकेला सिमेंट काँक्रिटचा करायचा होता. ट्रफिक पोलीस त्यांना परवानगी देत नव्हते. मी त्यावेळी पालिकेत कार्यकारी अभियंता होतो. मी माझा मित्र पत्रकार चंदू कुलकर्णीला सांगितलं. त्याने लोकसत्तेत पहिल्या पानावर लेख टाकला. दुसऱ्या दिवशी पोलिसांनी ऑफिसात परवानगी आणून दिली. त्यानंतर जोशीसर एकदा मला म्हणाले होते, ‘अनेकांना कल्पना नसते की, मुख्यमंत्र्याच्या हातात काय ताकद असते.’ 1996 साली मुंबईत विश्वचषकाचा सामना होता. स्टेडियमवर नव्याने दिवे लावले होते. माझ्या मुख्य अभियंत्याने ते मला पाहायचे आहेत असं सांगितलं. त्याच्याबरोबर चार ठेकेदार होते. आम्ही मैदानातून फिरत असताना मनोहर जोशी आले. एक ठेकेदार थोडं कुत्सितपणे म्हणाला, ‘तुम्ही मुख्यमंत्र्यांना ओळखता ना, आमची ओळख करून द्या.’ इतक्यात सरांनी मला पाहिलं आणि त्यांनी सर्वांच्या समोर मला मिठी मारली. मीसुद्धा आश्चर्यचकित झालो. ते तर वेडावले. हे सर्व त्यांच्यावर टीका करून. त्यानंतर माझी महानगरपालिकेत वट वाढली.

तिसरा किस्सा फार महत्वाचा, प्रवीण अमरेला सरकारी घर मिळालं. त्याने घरात सुंदर इंटेरियर केलं. वर्षाच्या आत कळलं की, तो फ्लॅट अनधिकृत आहे. सरकारने दिलेला फ्लॅट चक्क अनधिकृत! विश्वास ठेवाल? प्रवीणला घेऊन आम्ही सरांकडे गेलो. सरही हतबुद्ध झाले, पण त्यांनी सरकारी कोटय़ात त्याला दुसरी जागा दिली. हसतमुख, मिठ्ठास बोलणं, आपण वेगळे आहोत हा फील समोरच्याला न देणे, बुद्धिमत्ता, एखाद्या विषयाचं आकलन हे गुण मला सरांमध्ये दिसले. त्यांच्या राजकारणाबद्दल मी लिहीत नाही, कारण तो माझा विषय नाही. ते नेहमी म्हणत, ‘राजकारण कसं करावं हे मी मुंबई क्रिकेट असोसिएशनमध्ये शिकलो.’ तेव्हा ती अतिशयोक्ती होती. पण आता जाणवतं, राजकारणाच्या मुख्य प्रवाहात जाण्यासाठी कुठल्याही क्रिकेट असोसिएशनच्या पाठशाळेतून जाणं कधीही फायदेशीर.