
कोल्हापूर आणि सोलापूर जिह्यांत शनिवारी रात्री 11 वाजून 50 मिनिटांनी भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले. या भूकंपाचा केंद्रबिंदू कोल्हापूरपासून 19 किलोमीटर पन्हाळा तालुक्यातील कळे आणि पणुत्रे गावांमध्ये असल्याची माहिती जिल्हा आपत्तिव्यवस्थापनाने दिली. या भूकंपाची तीव्रता 3.9 रिश्टर स्केल इतकी नोंदविण्यात आली.
जमिनीच्या आत भूकंपाची खोली 38 कि.मी. असल्याने भूकंपाचे धक्के सौम्य प्रमाणात जाणवल्याची माहिती समजते. कोयनापासून 152 किलोमीटर अंतरावरही हा भूकंप झाला. दरम्यान, या भूकंपात कोणतीही जीवित अथवा वित्तहानी झाली नसल्याचे समोर आले आहे. कोयना धरणावरील भूमापन केंद्रावरही उजनी खोऱ्यात भूकंप झाल्याची नोंद आहे. सोलापूर शहरातील भवानी पेठ, मंगळवार पेठ, चैपाड, दक्षिण कसबा आणि सात रस्ता भागात भूकंपाचे धक्के जाणवले. भूकंपाच्या धक्क्यांनंतर नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते. मोठय़ा प्रमाणात लोक रस्त्यावर जमले होते.
























































