
नेपाळसाठी शुक्रवारची रात्र हाहाकार माजवणारी ठरली. नेपाळमध्ये 6.4 रिश्टर स्केलच्या भुकंपामुळे अनेक इमारती पत्त्यांसाख्या कोसळल्या. या विध्वंसक भूकंपामुळे आतापर्यंत 70 पेक्षा अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. ढिगाऱ्याखाली दबल्यामुळे अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत असून त्यांना बाहेर काढण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. जखमींना पुढील उपचारांसाठी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
रुकूम पश्चिमचे पोलीस उपअधीक्षक नामराज भट्टराई आणि जाजरकोटचे पोलील उपअधीक्षक संतोष रोक्का यांनी दिलेल्या माहितीनुसार या भूकंपाचा सर्वाधिक फटका रुकुम पश्चिम आणि जाजरकोटमध्ये बसला त्यामुळे या भागांमध्ये मृत्यू झालेल्या लोकांची संख्या जास्त आहे.
नेपाळमध्ये विध्वंस निर्माण करणाऱ्या भूकंपाची तीव्रता दिल्ली-एनसीआरसह संपूर्ण उत्तर भारतात जाणवली. बिहारमधील पाटणा आणि मध्य प्रदेशातील भोपाळपर्यंत या भूकंपाचे धक्के जाणवले. लखनऊ मध्ये भूकंपाच्या हादऱ्यांमुळे घाबरुन लोक घराबाहेर पडले होते.
नेपाळच्या राष्ट्रीय भूकंप मापन केंद्रानुसार, भूकंपाचा केंद्रबिंदू हा नेपाळच्या जाजरकोट जिल्ह्यातील लामिडांडा भागात होता. नेपाळचे पंतप्रधान पुष्प कमल दहल प्रचंड यांनी भूकंपामुळे झालेल्या मृत्यूबद्दल शोक व्यक्त करत बचाव आणि मदतीसाठी सुरक्षा यंत्रणेच्या 3 तुकड्या तैनात केल्या आहेत.
नेपाळ मध्ये भूकंपांच्या घटनांमध्ये वाढ
गेल्या काही महिन्यांपासून नेपाळ मध्ये भूकंपांच्या घटना वाढत आहेत. मागच्या महिन्यात 22 ऑक्टोबरला आलेल्या भूकंपाचे मुख्य केंद्र सुध्दा नेपाळ होते. 22 ऑक्टोबर रोजी नेपाळमध्ये भूकंपाचे 4 हादरे बसले होते. सकाळी 7 वाजून 39 मिनिटांनी भूकंपाचा पहिला झटका बसला त्याची तीव्रता 6.1 रिश्टर स्केल होती. त्यानंतर 8 वाजून 8 मिनिटांनी 4.2 रिश्टर स्केलचा दुसरा झटका बसला. भूकंपाचा तिसरा झटका 8 वाजून 28 मिनिटांनी बसला, त्याची तीव्रता 4.3 रिश्टर स्केल इतकी होती. यानंतर 8 वाजून 59 मिनिटांनी चौथ्यांदा भूकंपाचे धक्के जाणवले.
वाडिया इन्स्टिट्यूट ऑफ हिमालयन जिऑलॉजीचे माजी वरिष्ठ भूकंपशास्त्रज्ञ डॉ. अजय पॉल यांनी सांगितले की, गेल्या महिन्यात नेपाळमध्ये 5.7 रिश्टर स्केलचा भूकंप झाला होता. तेव्हा भूकंपाचे केंद्रबिंदू डोटी होते, जे शुक्रवारी झालेल्या भूकंपाच्या केंद्राजवळ आहे. नजिकच्या काळात हिमायलाच्या परीसरात पुन्हा मोठा भूकंप होण्याची भीती असल्याचे त्यांनी म्हटले.




























































