आईच्या हातची गरमागरम पोळी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

नाटय़निर्माते राहुल भंडारे. चविष्ट मांसाहार विशेष प्रिय. पण आईच्या हातच्या गरमागरम पोळीशिवाय जेवण पूर्ण होत नाही.

z ‘खाणं’ या शब्दाची तुमच्या दृष्टीने व्याख्या काय? – खाणं म्हणजे माझ्यासाठी आनंद आहे. मला स्वतःसोबत इतरांनाही खाऊ घालायला आवडतं. त्यामुळे मी सगळय़ांना खाण्यासाठी सोबत घेऊन जातो. कधी त्यांच्या आवडीचं खातो, तर कधी माझ्या आवडीचे पदार्थ खातो.

z खायला काय आवडतं? – मला चविष्ट खायला आवडतं. यामध्ये मांसाहार विशेष प्रिय आहे. मुंबईतील बऱयापैकी चांगल्या हॉटेलात मासे खायला जातो. तंदूर, पंजाबी हॉटेलात खायला आवडतं. माशांमध्ये पापलेट, बोंबिल, कोलंबी रवा फ्राय जास्त आवडतात.

z डाएट करता का? – तुर्तास करत नाही, पण आता चाळीशीनंतर सुरू करेन. डाएट, तब्येतीची काळजी, वेळेत खाणं या गोष्टी मला सुरू करायच्या आहेत. सकाळचा नाश्ता मी वेळेत आणि पोटभर करतो. नाश्त्यात सकाळीच पोळी-भाजी, वरण-भात असं जेवणासारखंच खातो.

z आठवडय़ातून किती वेळा बाहेर खाता? – चार वेळा तरी बाहेर खाणं होतंच.

z कोणत्या हॉटेलमध्ये जाता? – दादरमधलं रामी इंटरनॅशनलमध्ये खास मांसाहारी पदार्थ खाण्यासाठी जातो. मी मुळात पश्चिम महाराष्ट्रातला आहे, पण मालवणी किंवा कोकणी पदार्थ खायचे असतील तर कोकण किनारा आणि दाक्षिणात्य पदार्थांसाठी माटुंग्यातील शारदामध्ये जातो. तेथे ‘ऑमलेट डोसा’ उत्तम मिळतो.

z प्रयोगानिमित्त बाहेर असता तेव्हा खाणं-पिणं कसं सांभाळता? – नाटक संपल्यावर कलाकारांसोबतच जेवतो. जेवण आणि प्रवास या दोन्ही गोष्टी चांगल्या असतील तर त्याचा सादरीकरणावर परिणाम होतो. शक्यतो आम्ही घरगुती जेवण मागवतो. सकाळच्या वेळी पोहे, फ्रूट सलाड, ज्यूस, ऑमलेट, ब्रेड-बटर असा पोटभर नाश्ता करूनच निघतो, ताज, ऑबेरॉय सगळय़ाच हॉटेलात जेवलोय, पण आईच्या हातची पोळी खाल्ली नाही तर मला जेवल्यासारखे वाटत नाही. ती रोज गरमगरम पोळी मला खाऊ घालते. दौऱया वेळी मला तिच्या हातच्या पदार्थांची खूप आठवण येते.

z घरातल्या स्वयंपाकात काय खायला आवडतं? – मेथीची भाजी, वरण-भात, मांसाहार तर उत्तमच होतो.

z जेव्हा पाहुण्यांना घरी बोलवता तेव्हा आवर्जून काय खायला घालता? – शाकाहारी स्वयंपाकात घरी बनवलेलं श्रीखंड, संपूर्ण पंचपक्वान्नाचं जेवण असतं. मित्र मांसाहारी पदार्थ खाण्यासाठीही आवडीने येतात.

z स्वतः बनवू शकता अशी डिश आणि त्याची रेसिपी?- मला स्वयंपाक करायला शिकायचंय. सिंगल पलटी, हाफ फ्राय, भुर्जी असे ऑमलेटचे प्रकार उत्तम बनवतो.