इक्बाल मिर्चीच्या 700 कोटींच्या मालमत्तेवर ईडीची टाच; दुबईतील हॉटेलसह मुंबईतील फ्लॅट्स जप्त होणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अंमलबजावणी संचालनालयाने (ED) मरण पावलेला आंतरराष्ट्रीय ड्रग तस्कर इक्बाल मेमन उर्फ इक्बाल मिर्ची आणि त्याच्या कुटुंबाविरुद्ध मोठी कारवाई सुरू केली आहे. मिर्चीच्या कुटुंबाकडे असलेल्या मुंबई आणि दुबईतील सुमारे 700 कोटी रुपयांच्या 15 मालमत्ता कायमस्वरूपी जप्त करण्यासाठी ईडीने विशेष पीएमएलए (PMLA) न्यायालयात याचिका दाखल केली आहे.

गुन्हेगारी कारवायातील सहभागाबरोबरच फरार आर्थिक गुन्हेगार असलेल्या इकबाल मिर्ची आणि त्याच्या परिवाराच्या नावावर 700 कोटी रुपयांच्या 15 मालमत्ता वेगवेगळ्या ठिकाणी आहेत. त्या मालमत्ता जप्त करण्यासाठी ईडीने मुंबई सत्र न्यायालयातील विशेष न्यायालयात अर्ज दाखल केला आहे. याचिकेत राबिया मॅन्शन, मरियम लॉज आणि सी व्ह्यू मालमत्तांसह वरळी मालमत्ता आणि दुबईतील सुमारे 15 मालमत्तांचा समावेश आहे. यामध्ये बुर दुबईतील हॉटेल मिडवेस्ट अपार्टमेंट आणि बिझनेस बे आणि डीईसी टॉवर्समधील डझनभर व्यावसायिक आणि निवासी युनिट्सचा समावेश आहे.

न्यायालयाने 2021 मध्ये मिर्चीची पत्नी हाजरा, मुले आसिफ आणि जुनैद यांना ‘फरार आर्थिक गुन्हेगार’ घोषित केले आहे. ते सध्या परदेशात आहेत. डीएचएफएल (DHFL)चे प्रवर्तक धीरज वाधवान यांनी मिर्ची कुटुंबाला मालमत्ता हस्तांतरण करण्यासाठी मदत केल्याचा आरोप ईडीने केला आहे. वाधवान यांनी 32 कोटींच्या मालमत्ता केवळ 11 कोटींमध्ये मेमन कुटुंबाला दिल्याचा दावा करण्यात आला आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी 7 एप्रिल रोजी होणार आहे.