लेख : निस्पृह स्वातंत्र्यसेनानी गोविंदभाई श्रॉफ

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> सुहास रामचंद्र भाले (वडाळीकर)

प्रामाणिकपणा, चारित्र्य, त्याग, बलिदान या मूल्यांना सतत जपत एखाद्या सामाजिक कार्यात दृढनिश्चयाने गोविंदभाईं उडी घेत. मराठवाड्याचा सर्वांगीण विकास हा त्यांच्या अहोरात्र चिंतनाचा ध्यास होता, विषय होता. आज मराठवाड्याच्या शैक्षणिक, राजकीय, सामाजिक विकासाचे प्रगतिशील स्वप्न त्यांच्याच कार्याने पूर्ण झाल्याचे जाणवते. कमालीची सहिष्णुता, प्रेमळ वागणूक, निस्पृह असे हे व्यक्तिमत्त्व होते. 

मराठवाड्याचा निःस्पृह नेता, गांधीवाद, समाजवाद आणि साम्यवादाचे पुरस्कर्ते, मराठवाडा विकास महामंडळाचे जनक, हैदराबाद स्वातंत्र्यसंग्रामाचे ज्येष्ठतम सेनानी गोविंदभाई श्रॉफ यांचा आज जन्मदिवस!

वाचन आणि अध्ययन याची बालपणापासून आवड असणारे, एक समर्पित जीवन जगणारे, आयुष्यभर जिवापाड संघर्ष, धडपड करणारे अस्सीम त्यागी, अंधश्रद्धा, रूढी परंपरा, स्पृश्यास्पश्याबाबतचा भेदभाव आदींविरुद्ध सर्व शक्तिनिशी अहोरात्र झगडणारे नवनवीन आधुनिक मूल्यांचा स्वीकार करणारे गोविंदभाई यांची सारखी आठवण येते.

या आठवणीबरोबर डोळ्यापुढे त्यांच्या रूपाने खादी भांडार, श्री सरस्वती भुवन शिक्षण संस्था, स्वामी रामानंद तीर्थ संशोधन संस्था, मराठवाडा विकास महामंडळ, नांदेड येथील पीपल्स एज्युकेशन सोसायटी, मराठवाडा विकास परिषद, रेल्वे रुंदीकरण (ब्रॉडगेज लढा), साक्षरता अभियान, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील वाढीव विद्यार्थीसंख्या आंदोलन तसेच मराठवाडा अस्मितेच्या प्रश्नांबाबतचे अनेक लढे चलचित्रपटांप्रमाणे दिसू लागतात. म्हणतात ना जगावे, जगवावे व इहलोकीची यात्रा संपताना कार्याचा मोठा डोंगर, कीर्तीची पताका त्यावर अहोरात्र फडकत ठेवली ती या महापुरुषाने! आज कित्येकांचे वैयक्तिक, कौटुंबिक, सामाजिक, राजकीय प्रश्न गोविंदभाईंच्या कार्यानेच मिटले आहेत. कोणत्याही माणसाचे मोठेपण त्याच्या कर्तृत्वावर असते. आयुष्याची ६०-७० वर्षे मराठवाड्याच्या जनतेसमोर हिमालयाएवढे उत्तुंग कार्य विविध क्षेत्रांतून उभे केले ते गोविंदभाई श्रॉफ यांनी!

परभणीचे कृषी विद्यापीठ, संभाजीनगर येथील उच्च न्यायालयाचे खंडपीठ, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात नाट्यशास्त्र विभाग, या व इतर अशा अनेक मराठवाड्याच्या आंतरमनाची अस्मिता जोपासणार्‍या महत्त्वाच्या बाबी हेच भाईंच्या जीवनकार्याचे फलित होय!

प्रामाणिकपणा, चारित्र्य, त्याग, बलिदान या मूल्यांना सतत जपत एखाद्या सामाजिक कार्यात दृढनिश्चयाने गोविंदभाईं उडी घेत. मराठवाड्याचा सर्वांगीण विकास हा त्यांच्या अहोरात्र चिंतनाचा ध्यास होता, विषय होता. आज मराठवाड्याच्या शैक्षणिक, राजकीय, सामाजिक विकासाचे प्रगतिशील स्वप्न त्यांच्याच कार्याने पूर्ण झाल्याचे जाणवते. ते सर्वधर्म समभाव, वैज्ञानिक दृष्टिकोन याचे कट्टर पुरस्कर्ते होते. उदार व्यक्तिमत्त्वाचे ते प्रतीक होते. चुकलेल्यांना दुरुस्तीची संधी दिली पाहिजे, या सूत्रावर दृढ विश्वास ठेवणारे, दुसर्‍यांच्या अडचणी जाणून घेणारे, अत्यंत संवेदनशील होते. चुकीबद्दल क्षमा करण्याची प्रचंड क्षमता त्यांच्यात होती. कमालीची सहिष्णुता, प्रेमळ वागणूक एकंदरीत अत्यंत ऋजू असे हे व्यक्तिमत्त्व होते.

अन्याय घडो शेजारी, की दुनियेच्या बाजारी। धावून तिथेही जाऊ!! या वृत्तीने, जाणिवेने त्यांचे कार्य होते. गाव पातळीपासून राज्य पातळीपर्यंतचे भूमिपुत्र मार्गदर्शन घेण्यासाठी, आपल्यावर झालेला अन्याय मांडण्यासाठी व न्याय मिळवून घेण्यासाठी वैयक्तिक, सामूहिक पद्धतीने गुलमंडी येथील घरी किंवा श्रीसरस्वती भुवनच्या शिक्षण संस्थेच्या त्यांच्या कार्यालयात अथवा स्वामी रामानंद तीर्थ संशोधन संस्थेच्या कार्यालयात येत. भाई या अन्यायाला वाचा फोडीत व न्याय मिळवून देत.

माजी पंतप्रधान पी. व्ही. नरसिंहराव, माणिकचंद पहाडे, बाबासाहेब परांजपे, झुल्फेकार अली, दिगंबरराव बिंदू, अच्युतराव देशपांडे, भाऊसाहेब मोरे यांनी भाईंच्या सर्व कार्यात साथ दिली. तसेच त्यांचे सहकारी व मित्र दैनिक ‘मराठवाडा’चे ज्येष्ठ संपादक अनंत भालेराव, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण, अच्युतराव देशपांडे, आशाताई वाघमारे, आनंदकृष्ण वाघमारे, गंगाप्रसाद अग्रवाल, स्वामी रामानंद तीर्थ, चंद्रगुप्त चौधरी, विनायराव चारठाणकर, पुरुषोत्तम चपळगावकर, प्रा, दिनकर बोरीकर, नारायणराव चव्हाण, भाऊसाहेब वैशंपायन, जगन्नाथराव बर्दापूरकर, पु. बा. जोशी, काशीनाथ नावंदर, द्वारकादास पटेल, श्रीनिवास खोत, रतीलाल जरीवाला, बापूसाहेब काळदाते, वगैरे सामाजिक कार्यकर्त्यांनी त्यांना मोलाची साथ दिली!

गेविंदभाईंच्या कार्याचा, निःस्पृहतेचा आम्हाला अभिमान वाटतो. याचे कारण त्यांनी राजकीय कार्यकर्त्यांना चांगल्या सामाजिक विचाराने प्रेरित केले. आर्थिकदृष्ट्या शोषितांच्या गरजांचा विचार करून कार्यकर्त्यांना सामाजिकदृष्ट्या प्रगतीची दिशा दाखवली. आज विधायक कामात कार्य करणार्‍या कार्यकर्त्याला मार्ग दाखविणार्‍या नेतृत्वाची गरज आहे. भाईंसारख्या नेतृत्वाची मराठवाड्याला गरज आहे