
वैश्विक – [email protected]
अंतराळयात्री होऊन कर्तृत्वाची पताका थेट पृथ्वीपल्याड नेणाऱ्या अनेक महिलांविषयी आपण या स्तंभातून थोडक्यात माहिती घेत आहोत. यापैकी प्रत्येक महिला अंतराळयात्रीचं काही ना काही गुणवैशिष्ट्य आहे.
आपलं करीअर (कार्यक्षेत्र) वेगळं असलं तरी विशेष काही करून दाखविण्याच्या जिद्दीने अनेक महिलांनी अंतराळ क्षेत्राची निवड केली. अॅना ली फिशर यांचीही गोष्ट अशीच आहे. केवळ करीअरच नव्हे, तर दोन मुलांचा संसार सांभाळून अंतराळोड्डाण करण्याचं धैर्य दाखवणारी अॅना फिशर पहिली ‘आई’ अंतराळवीर ठरली. ‘फर्स्ट मदर इन द स्पेस’ म्हणून त्यांचा यथोचित गौरव करण्यात आला.
१९४९ मध्ये न्यूयॉर्क येथे जन्म झालेल्या अॅना यांचं महाविद्यालयीन शिक्षण कॅलिफोर्निया राज्यातील लॉस एन्जेलिस येथे झालं. रसायनशास्त्र, एक्स-रे क्रिस्टलोग्राफी असे विषय त्यानी अभ्यासले. त्यात प्रावीण्य मिळवलं. त्यानंतर ‘इमर्जन्सी मेडिसिन’चा अभ्यासक्रम पूर्ण करून त्या लॉस एन्जेलिस भागातील अनेक रुग्णालयांसाठी काम करू लागल्या.
रसायनशास्त्र हा अभ्यासाचा विषय असला तरी माणसाची केमिस्ट्री (वृत्ती) विविध गोष्टींचा अनुभव घेण्याची असू शकते. त्यानुसार अॅना फिशर यांना ‘नासा’च्या अंतराळ कार्यक्रमात काम करावं असं वाटलं. १९७८ मध्ये ‘नासा’ संस्थेत त्यांचं प्रशिक्षण सुरू झालं. वर्षभरात त्या विशिष्ट जबाबदारी पार पाडून अंतराळात जाण्यासाठी सज्ज झाल्या.
स्पेस शटल किंवा अंतराळयान अवकाशात झेपावताना त्याच्या रॉकेटपासून ते प्रत्यक्ष यान अंतराळ कक्षेत स्थिर होण्यापर्यंत अनेक गुंतागुंतीच्या प्रक्रिया असतात. कमी वजनाचं प्रभावी इंधन, हलके पण कणखर धातू किंवा वस्तू यांचा वापर यशस्वीरीत्या करता आला तर उड्डाणाचं ‘पे लोड’ कमी होऊ शकतं. अशा प्रकल्पात काम करण्याची संधी अॅना यांना मिळाली.
त्यात मुख्यत्वे यानाचा ‘रोबोटिक आर्म’, कमी वजनाचा, आकाराचा स्पेस-सूट आणि अंतराळयानाला दुरुस्तीची गरज लागली तर राबवली जाणारी प्रभावी पद्धत अशा अनेक बाबतीत त्यांनी काम करून आपली योग्यता सिद्ध केली.
१९८४ मध्ये ‘डिस्कव्हरी’ यानातून त्यांना अंतराळात जाण्याची संधी मिळाली, पण ही केवळ ‘प्लेझर ट्रिप’ नव्हती. तिथे जाऊन अनेक कामं करायची होती. दोन उपग्रह त्यांच्या कक्षेत सोडायचे होते तसेच आणखी दोन नादुरुस्त झालेल्या उपग्रहांची दुरुस्ती करायची होती. मिशन स्पेशॅलिस्ट म्हणून अॅना ली फिशर यांनी आठ दिवस अंतराळात काम केलं.
त्यानंतरच्या काळात त्यांनी अंतराळ संस्थेत नियोजन विभागात काम सुरू केलं. आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाला पूरक असं पृथ्वीवरून केलं जाणारं हे काम होतं. ऍस्ट्रॉनॉट ऑफिसमध्ये काही वर्षे या कामाचा अनुभव घेतल्यानंतर त्या ‘स्पेस स्टेशन’ विभागाच्या प्रमुख झाल्या. या काळात त्यांना ४० ते ५० अंतराळवीर आणि तंत्रज्ञांच्या कामगिरीवर देखरेख ठेवून मार्गदर्शन करायचं होतं. स्पेस स्टेशनच्या हार्डवेअरमधील डिझाइन, डेव्हलपमेंट या गोष्टींचं सुसूत्रीकरण (को-ऑर्डिनेशन) करण्याची जबाबदारी त्यांच्यावर होती.
अशा अनेक अंतराळ प्रकल्पांवर काम केल्यानंतर २०१७ मध्ये फिशर यांनी या कार्यातून निवृत्ती स्वीकारली. रसायनशास्त्र्ाज्ञ, सेवाभावी ‘इमर्जन्सी फिजिशियन’ (डॉक्टर) ते मातृत्व लाभलेली यशस्वी अंतराळवीर असा त्यांचा प्रवास. अॅना फिशर या ‘मॅनेजमेंट ऍस्ट्रॉनॉमर’ म्हणून कार्यरत होत्या. नासाच्या कॅप्सूल कम्युनिकेटर आणि एक्स्प्लोरेशन विभागात त्यांनी एकाच वेळी आपल्या कामाचा ठसा उमटवला. अमेरिकेच्या अंतराळ कार्यक्रमातील उणिवांचीही जाणीव त्यांना असणार. म्हणूनच त्यांनी नव्या तरुण अंतराळयात्रींना ‘स्टडी रशियन’ असा परखड सल्ला निवृत्तीच्या वेळी दिल्याचं म्हटलं आहे.




























































