
सामना ऑनलाईन, मुंबई
लांब पल्ल्याच्या एक्स्प्रेसमध्ये प्रवाशांना गुंगीचे औषध देऊन लुटणाऱ्याला रेल्वे गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली. जगदीश साहू असे त्याचे नाव आहे तर दीपक सोनी आणि साईल खान हा फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.
या गुह्याचा तपास गुन्हे शाखेचे पोलीस करत होते. पोलीस उपायुक्त पुरुषोत्तम कराड यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक आयुक्त विनय गाडगीळ, गुन्हे शाखेचे वरिष्ठ निरीक्षक संतोष धनवटे, सहायक निरीक्षक किरण मतकर, पोलीस हवालदार सुनील लोणकर, बबन कदम, दिलीप खोतकर, पोलीस नाईक महेश निकम, लक्ष्मण कुटे, पृथ्वीराज मोरे, राहुल माने यांचे पथक तपास करत होते. तपासादरम्यान लोणकर आणि स्टाफ हे अंधेरी येथे आले तेव्हा पोलिसांना पाहून जगदीश साहू पळू लागला. त्याला पकडून पनवेल रेल्वे पोलीस ठाण्यात आणले. चौकशीदरम्यान जगदीशने दीपक आणि साईलच्या मदतीने चोऱ्या केल्याची कबुली दिली.
अशी होती चोरीची स्टाईल
जगदीश, दीपक आणि साईल हे तिघेही भोपाळचे रहिवासी आहेत. जगदीश हा अयोध्या नगर येथे अंडे विक्री करायचा. त्याच दरम्यान जगदीशची दीपकसोबत ओळख झाली. 2014 मध्ये दीपक हा जेलमधून सुटला. त्यानंतर ते तिघे मिळून एक्स्प्रेसमध्ये चोऱ्या करू लागले. दीपक आणि साईल हे एकटा असलेल्या प्रवाशाला हेरायचे. त्याला चहा, कॉपी, बिस्किटमधून गुंगीचे औषध द्यायचे. प्रवासी बेशुद्ध झाल्यावर दीपक आणि साईल हे आडोसा करायचे तर चोरीचा मुद्देमाल नेण्याचे काम जगदीश करायचा. दीपक हा त्याच्या सासऱ्याच्या औषधाच्या चिठ्ठीचा वापर करून मेडिकलमधून औषध खरेदी करायचा. त्या गुंगीच्या औषधाचा वापर चोरीकरिता करायचे.




























































