काँग्रेसला मोठा धक्का बसणार, 8 आमदार भाजपमध्ये जाण्याच्या तयारीत

गोव्यामध्ये काँग्रेसला मोठा धक्का बसणार असल्याचे सांगितले जात आहे. काँग्रेसचे 8 आमदार भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे कळते आहे. गोवा भाजप अध्यक्ष सदानंद तानावडे यांनी काँग्रेसचे 8 आमदार भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे सांगितले आहे.

गोव्यातील काँग्रेस पक्षाचे 8 आमदार गोवा विधानसभेत पोहोचले असून. ते आताच भाजपमध्ये प्रवेश करत असल्याच्या चर्चांना उधाण आलेले आहे. निवडणूक झाल्यानंतर काँग्रेसचे आमदार भाजपच्या वाटेवर जाण्याची ही दुसरी वेळ आहे. काँग्रेस आमदार फोडण्याचा पहिला प्रयत्न झाला तेव्हा त्यांना थांबवण्यात काँग्रेस नेत्यांना यश आलं होतं. गोवा विधानसभा निवडणुकीनंतर काँग्रेसचे एकूण 11 आमदार निवडून आले होते, त्यातील 8 आमदार भाजपच्या वाटेवर आहेत. गोव्यामध्ये भाजपचे 25 आमदार आहेत.

भाजपच्या वाटेवर असलेल्या काँग्रेस आमदारांची नावे

  • दिगंबर कामत
  • मायकल लोबो
  • डिलाइला लोबो
  • केदार नाईक
  • राजेश फळदेसाई
  • रुडाल्फ़ फर्नांडिस
  • संकल्प आमोणकर
  • आलेक्स सिक्वेरा

जुलै महिन्यात झालेल्या गोवा विधानसभा अधिवेशनाच्या आदल्या दिवशी काँग्रेसला खिंडार पाडून ऑपरेशन कमळ यशस्वी करण्याचा भाजपाचा डाव फसला होता. भाजपाने काँग्रेसचे 8 आमदार फोडण्यासाठी जोरदार फिल्डिंग लावली होती, मात्र फक्त 5 आमदार त्यांच्या गळाला लागल्याने ऑपरेशन कमळ फसले होते.

ऑपरेशन कमळसाठी पुढाकार घेतलेल्या मायकल लोबो यांची विरोधी पक्षनेतेपदावरून तत्काळ हकालपट्टी करण्यात आली होती. काँग्रेसचे गोवा प्रभारी दिनेश गुंडू राव यांनी एक पत्रकार परिषद घेतली होती ज्यात त्यांनी माजी मुख्यमंत्री दिगंबर कामत यांनी पाठीत खंजीर खुपसला अशी खंत व्यक्त केली होती. कामत आणि लोबो या दोघांवर कारवाई होणार असा इशारा दिनेश गुंडू राव यांनी दिला होता.