धक्कादायक! मुंबई पोलीस दलात सेक्स स्कँडल, उपायुक्त आणि दोन निरीक्षकांकडून 8 शिपाई महिलांवर बलात्कार

मुंबईच्या मोटार वाहन विभागात चालक असलेल्या आठ पोलीस शिपाई महिलांनी एक उपायुक्त आणि दोन पोलीस निरीक्षकांनी आपल्यावर वारंवार बलात्कार करून आपणास उद्ध्वस्त केल्याचा आरोप केला आहे. या गंभीर घटनेची सीबीआय, गुन्हे शाखा तसेच सायबर सेलमार्फत चौकशी करून संबंधित अधिकाऱयांवर कठोर कारवाई करावी, अशी कळकळीची विनवणी या शिपाई महिलांनी मुख्यमंत्री आणि मुंबईच्या पोलीस आयुक्तांकडे एका पत्राद्वारे केली आहे. या ‘सेक्स स्पँडल’च्या तक्रारीची प्रत व्हायरल झाल्याने साऱया पोलीस दलात खळबळ माजली आहे.

मुख्यमंत्री, गृहमंत्री, मुंबईचे पोलीस आयुक्त आणि वरिष्ठ पोलीस आधिकाऱयांच्या नावाने पोस्टाच्या माध्यमातून हे पत्र पाठवण्यात आले आहे. या पत्राची प्रत शुक्रवारपासून समाजमाध्यमांमध्ये व्हायरल झाली असून संपूर्ण पोलीस दल या पत्राने हादरले आहे. या पत्रात पीडितांनी नावे लिहिली असून स्वाक्षऱयाही केल्या आहेत. त्यामुळे पत्राचे गांभीर्य वाढले आहे.

पोलीस दलात अनेक चर्चा
व्हायरल पत्राबाबत मुंबई पोलीस दलातील वरिष्ठ अधिकाऱयांकडे विचारणा केली असता त्यांनी थेट प्रतिक्रिया टाळली व सारवासारव केली. ज्यांची नावे पत्रात आहेत त्यांनी हे पत्र लिहिले नसल्याचा दावा काहींनी केला. बदली आणि बढत्यांवरून जे गटतट पडलेत त्यातून हे आरोप झाल्याचे काहींचे म्हणणे आहे. यावर अधिकृतपणे पोलीस दलातून अद्याप कुणीही बोललेले नाही.

आवाज उठवताच बदली
बदली करण्याची आम्हाला सतत धमकी देण्यात येत होते. लैंगिक शोषणानंतर ब्लॅकमेल करून आमच्याकडून दरमहा एक हजार रुपये लाच घेण्यात आली. आम्ही या सर्वाविरोधात एकत्र येऊन संबंधित पोलीस उपायुक्तांकडे आवाज उठवला तेव्हा आमची बदली करण्यात आली. गृह विभाग आणि पोलीस आयुक्तांना 20 लाख रुपये लाच देऊन उपायुक्तांनी येथे पोस्टिंग मिळवली आहे. त्यांचे तुम्ही काहीच वाकडे करू शकत नाही, असे त्यांच्या ऑर्डलीने आम्हाला सांगितले. आम्हाला तिथून हुसकावून लावण्यात आले, असा आरोपही पत्रात करण्यात आला आहे.

आम्ही आठही जणी शेतकरी कुटुंबातील आहोत. पोलीस दलात नोकरी मिळाल्याने सुरक्षित वाटले, पण वरिष्ठांनी आम्हाला उद्ध्वस्त केले आहे. तुम्ही आम्हाला हवे ते दिले तर तुम्हाला डय़ुटीवर कोणतेच काम देणार नाही, असे आमिषही आम्हाला दाखवले, असा त्यांचा आरोप आहे.

चौकशीचे आदेश
शिपाई महिलांच्या नावाने व्हायरल करण्यात आलेल्या पत्राची आणि ज्या पोलीस अधिकाऱयांवर आरोप करण्यात आले आहेत त्यांच्या चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत अशी माहिती एका अधिकाऱयाने दिली.

अन्यथा आत्महत्या करू!
या तिन्ही अधिकाऱयांचे मोबाईल जप्त करून त्याची तपासणी व्हावी. त्यांना बडतर्फ करून कठोर कारवाई करावी, अन्यथा आम्ही सगळय़ा मैत्रिणी मिळून आत्महत्या करू. त्याला हे अधिकारी जबाबदार असतील, असा इशारा पीडितांनी दिला.

नेमका आरोप काय…
आठही पीडित महिला नागपाडा मोटार परिवहन विभागात चालक आहेत. दोन पोलीस निरीक्षक आणि एका उपायुक्तांनी सरकारी वाहनातून रूमवर नेऊन वारंवार बलात्कार केल्याचा त्यांचा आरोप आहे.

या तिघांसह एक लेखनिक, उपायुक्तांचा ऑपरेटर, चालक, ऑर्डली यांनीही उपायुक्त आराम करतात त्या खोलीत बलात्कार केल्याचा आरोप करण्यात आला आहे.

गरोदर राहिल्यानंतर गर्भपात करण्यास भाग पाडण्यात आले. प्रत्येकी सात हजार रुपये उपायुक्तांच्या आदेशावरून दिली व वाच्यता करू नये म्हणून धमकावले.

दोन्ही निरीक्षक आठवडय़ातून तीन दिवस आम्हाला जबरदस्ती घरी घेऊन जातात. आमचे अश्लील व्हिडीओ बनवले गेले असून ते व्हायरल करण्याची धमकी देऊन सतत ब्लॅकमेल केले जात आहे.