माझा ‘पेंग्विन’पेक्षा जनरल नरवणेंवर अधिक विश्वास; 2023 मधील ट्विट दाखवत राहुल गांधी सरकारवर पुन्हा बरसले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी माजी लष्करप्रमुख जनरल मनोज मुकुंद नरवणे यांच्या पुस्तकावरून पुन्हा एकदा केंद्र सरकारवर हल्ला चढवला आहे. माझा पेंग्विन प्रकाशकापेक्षा जनरल नरवणे यांच्यावर अधिक विश्वास असल्याचे राहुल गांधी म्हणाले. नरवणे यांच्या पुस्तकाबाबत दिल्ली पोलिसांनी नोंदवलेला एफआयआर आणि प्रकाशक ‘पेंग्विन रँडम हाऊस इंडिया’ने दिलेल्या स्पष्टीकरणावर राहुल गांधी यांनी माध्यमांना आपली प्रतिक्रिया दिली.

माजी लष्करप्रमुख जनरल नरवणे यांचे ‘फोर स्टार्स ऑफ डेस्टिनी’ हे पुस्तक अजून प्रकाशित झालेले नाही, असे प्रकाशक ‘पेंग्विन रँडम हाऊस इंडिया’ने स्पष्ट केले होते. पेंग्विनच्या या दाव्यावरच राहुल गांधी यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. पुस्तक प्रकाशित झाले नसल्याचा पेंग्विनचा दावा आणि जनरल नरवणे यांनी यापूर्वी केलेली विधाने यामध्ये तफावत असल्याचे राहुल गांधी यांनी 2023 मधील एक ट्विट दाखवून स्पष्ट केले.

नरवणे यांचे एक ट्विट आहे, ज्यामध्ये ते म्हणतात की ‘माझ्या पुस्तकासाठी फक्त या लिंकवर जा. माझा मुद्दा असा आहे की एक तर नरवणे खोटे बोलत आहेत किंवा पेंग्विन खोटे बोलत आहे. मला नाही वाटत की माजी लष्करप्रमुख खोटे बोलतील. हे आत्मचरित्र अद्याप प्रसिद्ध झाले नसल्याचा दावा पेंग्विनने केला असला तरी, भूतकाळात या पुस्तकाचा सार्वजनिकपणे प्रचार करण्यात आला होता, असेही राहुल गांधी म्हणाले.

पेंग्विन म्हणतेय की पुस्तक प्रकाशित झालेले नाही. पण हे पुस्तक ॲमेझॉनवर उपलब्ध आहे. जनरल नरवणे यांनी ट्विट केले आहे की, ‘कृपया 2023 मध्ये माझे पुस्तक खरेदी करा.’ माझा पेंग्विनपेक्षा नरवणे यांच्यावर जास्त विश्वास आहे. तुमचा पेंग्विनवर विश्वास आहे की नरवणे यांच्यावर? असा सवालही राहुल गांधी यांनी केला. तसेच या आत्मचरित्रातील मजकुरामुळेच हा वाद निर्माण झाला असावा, असेही ते म्हणाले.

माझा असा विश्वास आहे की नरवणेजींनी त्यांच्या पुस्तकात अशी काही विधाने केली आहेत जी मोदी सरकार आणि पंतप्रधानांसाठी गैरसोयीची आहेत. साहजिकच, पेंग्विन खरे बोलत आहे की माजी लष्करप्रमुख, हे तुम्हाला ठरवावे लागेल, असेही राहुल गांधी यावेळी म्हणाले.