
राष्ट्रवादीतून फुटून शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सामील झालेल्या अजित पवार यांना शुक्रवारी झालेल्या खातेवाटपात अर्थ खातं देण्यात आलं. यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांनी मिंधे गटाला टोला हाणला आहे. शिंदे गटातील आमदारांच्या जखमेवर मीठ चोळल्याचा प्रकार असल्याचं खडसे म्हणाले आहेत.
जळगाव येथे माध्यम प्रतिनिधींशी बोलताना एकनाथ खडसे यांनी मिंधे गटावर निशाणा साधला. अजित पवार यांना महाविकास आघाडी सरकारमध्ये दिलेल्या अर्थमंत्री पदावरच मिंधे गटाने आक्षेप घेतला होता. त्यावरून बोलताना एकनाथ खडसे म्हणाले की, एकनाथ शिंदे यांच्याबरोबर जे आमदार गेले होते. त्यांचा अजित पवारांवर आक्षेप होता. अजित पवार अर्थमंत्री असताना निधी देत नाहीत, त्यामुळे आमच्यावर अन्याय होतोय, असा आक्षेप शिंदे गटाच्या आमदारांचा होता. पण आता अजित पवारांकडेच अर्थखातं आलं आहे. मला वाटतं की एकनाथ शिंदे गटाचे जे आमदार अजित पवारांवर नाराज होते, या नाराज आमदारांच्या जखमेवर मीठ चोळून हे खातं अजित पवारांकडे दिल्याचं दिसतं आहे, असा टोला खडसे यांनी हाणला.

























































