मिंधे गटाचा ठाण्यात धुडगूस, पालघरात दडपशाही; सरकारी यंत्रणा हाताशी धरून शिवसैनिकांना घेरण्याचा प्रयत्न

सरकारी यंत्रणेचा गैरवापर आणि खोटे गुन्हे दाखल करण्याच्या कारवाया करत मिंधे गट शिवसैनिकांवर दबाव आणत आहे. ठाण्यात हल्ल्याची तक्रार दाखल करण्यासाठी पोलीस ठाण्यात गेलेल्या बेसावध शिवसैनिकांना मिंधे गटाच्या शेकडो गुंडांनी घेरले आणि पोलीस ठाण्यातच अधिकाऱयांसमोर अक्षरशः हैदोस घातला. त्यांनी रात्री दहा वाजल्यापासून पहाटे चार वाजेपर्यंत तब्बल सहा तास अख्खे पोलीस ठाणे वेठीस धरले. तर पालघरमध्ये जिल्हा परिषदेची सत्ता काबीज करण्यासाठी मिंधे गटाने सरकारी यंत्रणा बटिकासारखी राबवत शिवसेनेच्या सदस्यांवर गुन्हे दाखल केले आणि 9 सदस्यांचे अपहरण केले. या घटनेमुळे ठाणे आणि पालघरमध्ये तणावाचे वातावरण आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा मतदारसंघ असलेल्या किसननगरातील भटवाडीत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या पदाधिकाऱयांच्या गाठीभेटी सुरू असताना मिंधे गटाच्या 100 ते 150 गुंडांनी शिवसैनिकांवर हल्ला चढवला. यात दोन शिवसैनिक जखमी झाले. खासदार राजन विचारे, ठाणे लोकसभा संपर्कप्रमुख मधुकर देशमुख, जिल्हाप्रमुख केदार दिघे, उपजिल्हाप्रमुख संजय घाडीगावकर हे तक्रार देण्यासाठी शिवसैनिकांसह पोलीस ठाण्यात गेले असता मिंधे गटाच्या बेफाम कार्यकर्त्यांनी पोलीस ठाण्याला घेराव घातला व धमकावले. शिवसेना मोताळा तालुकाप्रमुख अनंता दिवाणे यांच्यावर मंगळवारी अज्ञातांनी जीवघेणा हल्ला केला. त्यात त्यांच्यासह युवासेना उपजिल्हाप्रमुख शुभम घोंगटे गंभीर जखमी झाले आहेत. हे दोघे पक्षाच्या बैठकीसाठी बुलढाणा येथे आले होते.

मुख्यमंत्र्यांच्या मतदारसंघात गुंडाराज
फोडाफोडीचे राजकारण करून सत्ता मिळवलेल्या मिंधे गटाच्या दडपशाहीने हद्द केली आहे. बेसावध निष्ठावंत शिवसैनिकांवर हल्ला करण्यात काय मर्दुमकी? सरकारी यंत्रणा, पोलीस यांना हाताशी धरून मुख्यमंत्र्यांच्या मतदारसंघात गुंडाराज सुरू असल्याचा आरोप शिवसेनेचे खासदार राजन विचारे यांनी केला आहे.