काका नेहमी उडवत होता टर; रागाच्या भरात केली चुलत भावाची हत्या

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
murder

राजस्थानातील सीकर जिल्ह्यात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. एक तरूण आपल्या 10 वर्षांच्या चुलत भावाचा ब्लेडने गळा चिरून हत्या करत होता. भर रस्त्यात हे हत्याकांड घडत असताना जमाव मात्र या घटनेचा व्हिडीओ बनवण्यात गुंतला होता. जमावातील एकानेही मदतीसाठी पुढाकार घेतला नाही. त्यामुळे 10 वर्षांच्या मुलाला जीव गमवावा लागला आहे. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाल्यावर पोलिसांनी भावाची हत्या करणाऱ्या तरुणाला अटक केली आहे.

सीकर जिल्ह्यातील या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाल्याने खळबळ उडाली आहे. पोलिसांनीही घटनेची तातडीने दखल घेत आरोपीला अटक केली आहे. काका नेहमी टर उडवत असल्याच्या रागातून तरुणाने काकाच्या मुलाची हत्या केल्याचे प्राथमिक तपासातून दिसून येत असल्याचे पोलिसांनी सांगितले. तसेच या दोन कुटुंबात वाद होता, अशी माहितीही पोलिसांना मिळाली आहे.

सीकर जिल्ह्यातील दांतारामगड जिल्ह्यात शुक्रवारी दुपारी ही धक्कादायक घटना घडली आहे. 21 वर्षांच्या कैलाशचंद याने 10 वर्षांचा चुलत भाऊ उत्तम याला पोषण आहार आणण्यासाठी नेतो, असे सांगत त्याला सोबत नेले. घरापासून थोडे दूर आल्यावर कैलाशचंदने उत्तमला मारहाण करण्यास सुरुवात केली. दोन भावांमध्ये भांडण सुरू आहे, असे समजून जमाव त्यांचा व्हिडीओ बनवत होता.

उत्तमला मारहाण करत कैलाशचंदने खिशातून ब्लेड काढले आणि उत्तमचा गळा चिरायला सुरुवात केली. जमावाला काही समजण्याच्या आधीच उत्तम रक्ताच्या थारोळ्यात पडला होता. त्याचा घटनास्थळीच मृत्यू झाला होता. कैलाशचंद उत्तमचा गळा चिरत असताना कोणीही मदतीसाठी पुढे आले नाही. घटनेनंतर जमावाने कैलाशचंदला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. दोन भावांमध्ये भांडण सुरू असल्याचे समजून आम्ही या वादात पडलो नाही, असे काही प्रत्यक्षदर्शींनी पोलिसांना सांगितले.

आपणच उत्तमची हत्या केली आहे, असे कैलाशचंदने जमावाला सांगितले. काका आपली नेहमी टर उडवत होता. आपल्याला काहीही येत नाही, असे तो सर्वांना सांगत होता. शाळेत अतसाना तो आपल्याला अभ्यासही करू देत नव्हता, तुलाच काहीच येत नाही, तू काय अभ्यास करणार असे टोमणे तो नेहमी आपल्याला मारत होता. त्याचा राग आपल्या मनात होता. त्यामुळे त्याच्या मुलाची हत्या केल्याचे कैलाशचंदने सांगितले. या घटनेचा व्हिडीओही व्हायरल झाला आहे.

आपण गेल्या काही दिवसांपासून उत्तमची हत्या करण्याची योजना आखत होतो. योजना ठरल्यावर आपण एका दुकानातून दोन ब्लेड विकत घेतले. त्यानंतर पोषण आहार देण्याच्या बहाण्याने उत्तमला आपल्यासोबत आणले. आसपासच्या लोकांना भावांमधील भांडण आहे, असे वाटण्यासाठी त्याला मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यानंतर ब्लेड काढून त्याचा गळा चिरून हत्या केली, असे कैलाशचंदने सांगितले.

पोलिसांनी कैलाशचंदला अटक केली असून त्याने गुन्ह्याची कबूली दिली आहे. त्याचे शिक्षण आयटीआयमधून झाले आहे. मात्र, काकाबद्दल मनात राग असल्याचे त्याने हे कृत्य केल्याचे पोलिसांनी सांगितले. तसेच हे दोन्ही कुटुंब एकत्र राहत असून त्यांच्यात एकमेकांविरोधात काळी जादू करण्यावरून आणि इतर गोष्टीवरून नेहमी वाद होत होते. एकमेकांना शिवीगाळ करणे आणि धमकावण्याचे प्रकारही होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे. कैलाशचंद काही वर्षांपासून औषधे घेत असल्याची माहितीही पोलिसांना मिळाली आहे. मानसिक आजारासाठी तो औषधे घेत होता काय, याचीही माहिती घेण्यात येत आहे. याबाबत अधिक तपास करण्यात येत असल्याचे पोलिसांनी सांगितले.