निवडणूक लढविणार्‍या उमदेवारांची संख्या रोडावली

69

राज्यात विधानसभा निवडणूक लढवणार्‍यांची संख्या वाढत असल्याचे  वाटत असले तरी वाढती महागाई, कार्यकर्त्यांचे  ‘वाढते दर’ व आर्थिक मंदीमुळे उमेदवारांची संख्या कमी होत असल्याचे चित्र आहे. मागील गेल्या दोन विधानसभा निवडणुकीच्या तुलनेत यंदा निवडणूक लढविणार्‍या उमदेवारांची संख्या कमालीची रोडावली आहे. यावेळी चौदाव्या विधानसभा निवडणुकीत 3 हजार 239 उमेदवार राजकीय नशीब अजमावत आहेत. पाच वर्षापूर्वीं म्हणजे 2014 मध्ये 4 हजार 119 उमेदवारांनी निवडणूक लढवली होती.

विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत 7 ऑक्टोबरला संपली. या मुदतीत 1 हजार 504 उमेदवारांनी निवडणुकीतून माघार घेतली. माघारीनंतर निवडणूक लढतींचे चित्र स्पष्ट झाले असून 288 जागांसाठी 3 हजार 239 उमेदवार रिंगणात राहिले आहेत. गेल्या निवडणुकीच्या तुलनेत यंदाच्या निवडणुकीत उमेदवारांची संख्या 880 ने कमी झाली आहे.

विधानसभा निवडणुकीसाठी आघाडी आणि युती झाल्याने उमेदवारांची संख्या घटली आहे. निवडणुकीत शिवसेना-भाजप महायुतीने  288 उमेदवार तर काँग्रेसने 146 तर राष्ट्रवादी काँग्रेसने 117 उमेदवार उतरवले आहेत. वंचित बहुजन आघाडीने 250 विधानसभा मतदारसंघांत उमेदवार दिले आहेत. याशिवाय मनसे 150 च्या आसपास जागा लढवत आहे.

आर्थिक मंदीचे वातावरण, निवडणूक लढण्यासाठी येणारा खर्च, निवडणूक व्यवस्थापन यंत्रणा तसेच कार्यकर्त्यांचा अभाव, मतदान यंत्राबाबतची साशंकता आणि निवडून येण्याची खात्री नसल्याने अनेक हौशी उमेदवारांनी निवडणुकीकडे पाठ फिरविल्याचे राजकीय निरीक्षकांचे मत आहे.

राज्यात एक कोटीहून अधिक तरुण मतदार

राज्यात 18 ते 25 वयोगटातील 1 कोटी 6 लाख 76 हजार 13 तरुण मतदारांची नोंदणी करण्यात आली आहे. यामध्ये 60 लाख 93 हजार 518 युवक तर 45 लाख 81 हजार 884 युवती आहेत. 611 तृतीयपंथी मतदारांची नोंदही करण्यात आली आहे. राज्यात 4 ऑक्टोबर 2019 पर्यंत करण्यात आलेल्या मतदार नोंदणीमध्ये 8 कोटी 99 लाख 36 हजार 261 मतदारांची नोंदणी झाली आहे. या नोंदणीत एकूण 5 हजार 560 अनिवासी हिंदुस्थानींची नोंद झाली असून यामध्ये अनिवासी हिंदुस्थानी पुरुष 4 हजार 54 आहेत तर 1 हजार 506 अनिवासी हिंदुस्थानी महिलांची नोंद आहे.

गेल्या चार निवडणुकीतील  उमेदवारांची संख्या

1999……………… 2006

2004……………… 2678

2009……………… 3559

2014……………… 4119

आपली प्रतिक्रिया द्या