
सामना ऑनलाईन । नवी दिल्ली
निवडणूक प्रक्रियेतील सुधारणांबाबत सूचना करण्यासाठी सोमवारी नवी दिल्लीत राष्ट्रीय निवडणूक आयोगाने राष्ट्रीय आणि प्रादेशिक मान्यताप्राप्त पक्षांची बैठक बोलावली होती. या बैठकीत अनेक पक्षांनी बॅलेट पेपरने निवडणुका घेण्याची मागणी केली. आजच्या काळात बॅलेट पेपरने मतदान घेणे अयोग्य असून त्यामुळे बूथ कॅप्चरिंगचे युग परत येईल अशी भीती मुख्य निवडणूक आयुक्त ओ.पी. रावत यांनी यावेळी व्यक्त केली. अशा घटना टाळण्यासाठी ईव्हीएम आणि व्हीव्हीपीएटी मशीनने मतदान घेणे योग्य असल्याचे ते म्हणाले.
या बैठकीला सात राष्ट्रीय पक्ष आणि 51 प्रादेशिक पक्षांचे प्रतिनिधी उपस्थित होते. काँग्रेस,सपा,बसपा,तृणमूल काँग्रेस आणि आपसह अनेक पक्षांनी बॅलेट पेपरने निवडणुका घेण्याची मागणी आयोगाकडे केली. मात्र, ते अयोग्य असल्याचे मत आयोगाने नोंदवले. बूथ कॅप्चरिंगचे युग परत येऊ नये, अशी आमची इच्छा आहे. त्यामुळे बॅलेट पेपरने निवडणुका घेणे अयोग्य असल्याचे आयोगाने म्हटले आहे. काही पक्षांनी ईव्हीएम आणि व्हीव्हीपीएटी मशीनची विश्वासार्हता आणि त्यातील तांत्रिक अडचणींचा मुद्दा उपस्थित केला. आयोग त्यावर तोडगा काढणार असल्याचे रावत यांनी सांगितले. अनेक पक्षांनी निवडणूक प्रक्रिया विश्वासार्ह वातावरणात घेण्यासाठी दिलेल्या सूचनांचा विचार करणार असल्याचेही ते म्हणाले.
एक देश एक निवडणुकांबाबत विचारले असता ते म्हणाले, काही पक्ष एकत्र निवडणुका घेण्यासाठी सहमत आहेत. तर काही पक्षांनी याचा विरोध केला आहे. आयोगाने याबाबत आपले मत आधीच स्पष्ट केले आहे. देशभरात यावर सकारात्मक वातावरणात चर्चा सुरू आहे. त्यावर अंतिम निर्णय झाल्यावर आयोग त्याप्रमाणे तयारी करेल असेही ते म्हणाले.

























































