निवडणूक आली, पेट्रोल-डिझेल स्वस्त करण्याची वेळ झाली; केंद्र सरकार इंधनाचे दर कमी करणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

केंद्र सरकार आगामी निवडणुकीआधी महागाईवर नियंत्रण मिळवण्यासाठी ठोस पावले उचलण्याच्या तयारीत आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदी आगामी आठवडय़ात पेट्रोलच्या विक्रीवरील टॅक्स कमी करणार आहेत. तसेच खाद्यतेल आणि गहू आयातीवरील शुल्क कमी करण्यासंबंधी महत्त्वपूर्ण निर्णय घेण्याची शक्यता आहे. तसेच खाद्यतेल आणि इंधनाची दरवाढ रोखण्यासाठी विविध मंत्रालयातील बजेटमधील एक लाख कोटी रुपये वळवण्यासाठी प्रयत्नशील आहे.

16 राज्यांतील पेट्रोलच्या किमती शंभरीपार

हिंदुस्थानातील 16 राज्यांतील पेट्रोलच्या किमती शंभरीपार गेल्या आहेत. महाराष्ट्र, मध्य प्रदेश, आंध्र प्रदेश, बिहार, कर्नाटक, मणिपूर, तेलंगणा, पंजाब, झारखंड, सिक्कीम, ओडिशा, केरळ, तामीळनाडू, पश्चिम बंगाल, छत्तीसगड आणि राजस्थान या राज्यातील सर्व जिह्यात पेट्रोलच्या किमती 100 रुपयांपेक्षा जास्त आहेत. तर ओडिशा, राजस्थान आणि मध्य प्रदेशात डिझेल 100 रुपयांपेक्षा जास्त किमतीत विक्री केले जात आहे.

रशियातून 90 लाख टन गहू आयात करणार

केंद्र सरकार रशियातून जवळपास 90 लाख टन आयात करण्याच्या तयारीत आहे. हिंदुस्थानात गव्हाच्या किमतीत 10 टक्के वाढ झाली आहे. या किमतीवर नियंत्रण मिळवण्यासाठी सरकार 80 ते 90 लाख मेट्रिक टन गहू खरेदी करण्याची तयारी करीत आहे.