
सामना प्रतिनिधी । मुंबई
रायगड जिह्यातील काळ आणि कुंभे येथील २५ मेगावॅट क्षमतेच्या जलविद्युत प्रकल्पाच्या उभारणीवर आतापर्यंत कोटय़वधी रुपयांचा खर्च होऊनही काम अर्धवटच आहे. प्रकल्पासाठी सुमारे ७५० कोटी रुपये मंजूर खर्च असतानाही जवळपास बाराशे कोटी रुपये खर्ची पडले आहेत. त्यामुळे या प्रकल्पातून भविष्यात वीज निर्मिती सुरू झाल्यास प्रतियुनिट विजेचा किमान दर १५-१६ रुपयांच्या घरात जाणार आहे. त्यामुळे एवढी महागडी वीज कोण खरेदी करणार असा प्रश्न वीज क्षेत्रातून उपस्थित केला जात आहे.
काळ आणि कुंभे या दोन जलविद्युत प्रकल्पांसाठी धरण बांधणे, वीज निर्मिती उपकरणांची खरेदी करण्यासाठी सुमारे ७५० कोटी रुपये एवढा खर्च सरकारने मंजूर केला होता. मात्र त्यापेक्षा अधिक खर्च झाल्याने सरकारने सप्टेंबर २०१५ मध्ये प्रकल्पाचे काम बंद करून खर्च न करण्याचे आदेश दिले आहेत. आतापर्यंत धरणाच्या आणि यंत्रसामग्रीच्या खरेदीवर झालेला खर्च पाहता वीज निर्मिती सुरू झाल्यास त्याचा दर बाजारातील विजेपेक्षा अडीचपट अधिक असणार आहे. त्यामुळे हा वीज प्रकल्प सरकारच्या दृष्टीने पांढरा हत्ती ठरणार आहे.
-बीओटीसाठी कोण पुढे येणार
मंजूर खर्चापेक्षा अधिक खर्च झाल्याने हा प्रकल्प बांधा-वापरा-हस्तांतरित करा (बीओटी) तत्त्वावर उभारावा असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी जलविद्युत विभागाला यापूर्वीच दिले आहेत, पण येथून तयार होणारी वीज महागडी ठरणार असल्याने हा अर्धवट प्रकल्प कोण बीओटी तत्त्वावर पूर्ण करण्यासाठी पुढे येईल, असा सवाल जलविद्युत विभागाच्या एका अधिकाऱयाने व्यक्त केला.


























































