वीजवाहक तारा चोरणे बेतले जीवावर, संगमनेर तालुक्यात युवकाचा मृत्यू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

वीजवाहक टॉवरवरील ऍल्युमिनीअमच्या तारांची चोरी करत असताना एक तार तुटून कमरेभोवती बांधलेल्या दोरखंडाचा गळफास बसून एकाचा मृत्यू झाला आहे. संगमनेर तालुक्यातील शिंदोडी शिवारात रविवारी पहाटे ही घटना घडली आहे. याप्रकरणी घारगाव पोलिसात पाचजणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून, दोन वाहने जप्त करण्यात आली आहेत.

योगेश रावसाहेब विघे (वय 20, रा. पिलानी वस्ती, चिकलठाण, ता. राहुरी) असे मृताचे नाव आहे. विशाल राजेंद्र पंडित (वय 18), आदित्य अनिल सोनवणे (वय 20, रा. शिंदोडी), संकेत सुभाष दातीर (वय 26, रा. प्रिंप्रिलौकी), सर्फराज इक्बाल शेख (रा. रामगड, ता. श्रीरामपूर) यांच्यासह एका विधिसंघर्षित बालकावर गुन्हा दाखल झाला आहे.

विशाल आणि आदित्य हे योगेशला घेऊन शिंदोडी येथे आले होते. या सर्वांनी पहाटे एक ते तीन वाजण्याच्या दरम्यान शिंदोंडी शिवारात वीज वाहून नेणाऱया टॉवरवरील वायर चोरण्यासाठी योगेशला टॉवरवर चढवून टॉवरवरील ऍल्युमिनियम धातूच्या विजेच्या तारा कापण्यास सांगितले. तारा कापत असतानाच योगेशच्या पोटाला बांधलेल्या दोरीने त्याला गळफास बसला. त्यामुळे वरील पाचजणांनी इनोव्हा कारमधून योगेशला औषधोपचारासाठी लोणी पीएमटी रुग्णालयात नेले. मात्र, त्याचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला असल्याचे रुग्णालयाच्या वतीने सांगण्यात आले.

याप्रकरणी रावसाहेब सुखदेव विघे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून घारगाव पोलिसांनी चौघांसह एका विधिसंघर्षित बालका विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलीस निरीक्षक सुनील पाटील तपास करत आहेत. या घटनेत पोलिसांनी इनोव्हा कारसह टेम्पोही जप्त केला.