
सामना प्रतिनिधी । मुंबई
राज्यातील विजेच्या वाढत्या मागणीचा विचार करून महावितरणने 2010मध्ये महानिर्मितीबरोबर वीज खरेदी करार केला आहे. त्यानुसार महानिर्मिती तब्बल 9570 मेगावॅटचे नवीन वीज प्रकल्प (संच) उभारणार होते. पण गेल्या आठ वर्षांत महानिर्मितीने या करारातील एकही वीज प्रकल्प उभारलेला नाही. त्यामुळे महावितरणने वीज खरेदी करार केलेले महानिर्मितीचे सात वीज प्रकल्प केवळ कागदावरच असल्याचे उघड झाले आहे.
भविष्यात विजेची मागणी मोठय़ा प्रमाणात वाढली तर ती पूर्ण करताना महावितरणला तारेवरची कसरत करावी लागणार आहे. महावितरणची सध्या कमाल 20 हजार मेगावॅट एवढी विजेची मागणी आहे. त्यापैकी सुमारे पन्नास टक्के वीज महानिर्मितीकडून पुरवली जात आहे.


























































