अकरावीच्या विशेष फेऱयांची प्रवेशप्रक्रियाही संपली, अद्याप हजारो विद्यार्थी प्रवेशापासून वंचित

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अकरावीच्या तीन नियमित फेऱया आणि दोन विशेष फेर्यांची प्रक्रिया शनिवारी संपली. काँलेज अलॉट झालेल्या जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित करावा यासाठी विशेष फेरी 2 नुसार प्रवेश घेण्याची मुदत आज 9 जानेवारीपर्यत वाढविण्यात आली होती. पण या मुदतीनंतरही हजारो विद्यार्थी प्रवेशापासून वंचित राहण्याची शक्यता आहे.

तीन नियमित आणि दोन विशेष फेऱयांनंतर तब्बल एक लाख 24 हजार 285 जागा रिक्त राहिल्या आहेत. शुक्रवार 8 जानेवारीपर्यंत सुमारे 8 हजार 939 विद्यार्थी प्रवेशाविना असल्याचे स्पष्ट झाले आहे. यातील किती विद्यार्थ्यांनी शनिवारी वाढीव मुदतीत प्रवेश घेतले याची चित्र उद्यापर्यंत स्पष्ट होण्याची शक्यता आहे. आकडेवारीनुसार आतापर्यंत पार पडलेल्या तीन नियमित फेऱया आणि दोन विशेष फेऱयांनंतर ऑनलाइन प्रक्रिया आणि विविध कोटय़ांमधून एक लाख 96 हजार 127 विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित केले आहेत. यामध्ये कोटय़ातील प्रवेश हे 45 हजार 583 इतके आहेत. तर ऑनलाइन प्रक्रियेतून एक लाख 50 हजार 551 विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चिती केली आहे. यानंतर आठ हजार 939 विद्यार्थी प्रवेशाविना आहेत.

प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्यांसाठी प्रथम येणाऱयास प्रथम प्राधान्य फेरीचे आयोजन करण्यात येणार असून सोमवारी 11 जानेवारीपर्यंत याविषयीची माहिती अकरावी ऑनलाईन प्रवेशाच्या वेबसाईटवर जाहीर केली जाणार आहे.