
कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण मोहिमेत सर्वांचे लसीकरण व्हावे, यासाठी वेगाने काम केले जात आहे. मात्र, लग्नसमारंभ व बाजारपेठेत बेशिस्त गर्दी दिसत आहे. येथे मात्र नियमांची पायमल्ली होत असताना प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे.
‘ओमायक्रॉन’च्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासन सतर्क आहे. जिल्हा प्रशासनाने काही दिवसांपूर्वीच नव्या निर्बंधाचे आदेश जारी केले आहेत. मात्र, या आदेशाला मनपा व पोलीस प्रशासनाकडून वाटाण्याच्या अक्षता दाखविण्यात आल्या आहेत. प्रशासकीय यंत्रणेकडून नियमांची काटेकोरपणे अंमलबजावणी केली जात नाही. दरम्यान, पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी मागील आठवडय़ात कोरोना परिस्थिती व लसीकरणाचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी लसीकरण नसलेल्यांना पेट्रोल, रेशन आदी सुविधा न देण्याचे आदेश दिले. मात्र, प्रशासनाकडून या आदेशाची अद्यापि अंमलबजावणी झालेली नाही. नगर जिल्ह्यात अद्यापपर्यंत 9 लाख लोकांनी लसीचा डोस घेतलेला नाही. त्यामुळे लसीकरण वाढविण्यावर भर दिला जात असला तरी नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करण्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. शहरात लग्न समारंभात तर तोबा गर्दी होत आहे. नागरिक विनामास्क लग्न समारंभाला हजेरी लावत आहेत. बाजारपेठेत तसेच दुचाकीवरून जाताना मास्कचा वापर होत नाही. ओमायक्रॉनला रोखायचे असेल तर लसीकरण पूर्ण करणे गरजेचे आहे, असे मत तज्ञांनी व्यक्त केले आहे. कोरोनाला निर्बंध घालण्यासाठी प्रशासनाकडून नियमांचे पालन होते की नाही, याकडे लक्ष दिले जात नाही.
बाजारपेठ, लग्नसमारंभात बिनधास्त गर्दी
बाजारपेठ तसेच लग्नसमारंभात लोक बिनधास्त गर्दी करताना दिसत आहेत. बहुतांशी लोकांनी मास्क लावलेले नसतात. यामुळे कोरोना संपुष्टात आला की काय? असा समज या लोकांचा नाही ना, असाही प्रश्न उपस्थित होत आहे.
नगर जिल्ह्यात 50नव्या बाधितांची भर
जिल्ह्यात गुरुवारी कोरोनाचे नवे 50 बाधित आढळून आले. यामध्ये सर्वाधिक नगर शहरातील 13 रुग्णांचा समावेश आहे. गेल्या काही दिवसांपासून शहरात दहाच्या आत नवे बाधित आढळून येत होते. मात्र, गेल्या 24 तासांत ही संख्या 13 झाली आहे. जिल्ह्यातील इतर तालुक्यांच्या तुलनेत नगर शहरातील बाधितांची संख्या सर्वाधिक आहे. नव्या 50 बाधितांमध्ये जिल्हा रुग्णालयातील लॅबमध्ये 24, खासगी प्रयोगशाळेत 20, तर अँटीजेन चाचणीत 6 रुग्णांचा समावेश आहे.



























































