दीड वर्षापासून अंमलदारांना प्रवास भत्ताच नाही

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । मुंबई

नायगाव येथील सशस्त्र पोलीस मुख्यालयातील पण प्रतिनियुक्तीवर असलेल्या अंमलदारांना गेल्या दीड वर्षापासून प्रवास भत्ताच दिलेला नाही. अचानक कोणतीही पूर्वकल्पना न देता हा भत्ता देण्याचे बंद झाल्याने पोलिसांमध्ये प्रचंड नाराजीचे वातावरण आहे. नायगाव पोलीस मुख्यालयात जवळपास चार हजार कर्मचारी आहेत. अनेक अंमलदारांना प्रतिनियुक्तीवर मुख्यालयासह विविध ठिकाणी नियुक्त केले जाते. मुख्यालयापासून आठ किलोमीटर अंतरावर नोकरी करत असलेल्या अंमलदारांना दोन हजार प्रवास भत्ता दिला जातो. पण गेल्या दीड वर्षापासून आम्हाला हा प्रवास भत्ताच देण्यात आलेला नाही. त्यामुळे प्रचंड आर्थिक कुंचबणा होत असल्याचे अंमलदारांचे म्हणणे आहे. कोणतेही कारण न सांगता हा भत्ता देण्याचे बंद केल्याने आर्थिक परवड होत आहे. त्यामुळे याची वरिष्ठ पातळीवर तत्काळ दखल घेऊन प्रवास भत्ता देण्यास सुरुवात करावी असे अंमलदारांचे म्हणणे आहे.