
सामना प्रतिनिधी । मालवण
वर्षभरापूर्वी तारकर्ली येथे बंदर विभागाने एक कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्च करून उभारलेल्या सुसज्ज जेटीवर अज्ञातांनी खड्डे पाडले आहेत. तसेच काही ठिकाणी अतिक्रमणही करण्यात आले आहे. मात्र बंदर विभागाचे याकडे दुर्लक्ष होत असल्याने स्थानिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. या प्रकाराकडे बंदर विभागाने गांभीर्याने लक्ष पुरवून संबंधितांविरोधात सरकारी मालमत्तेचे नुकसान केल्याप्रकरणी गुन्हे दाखल करावेत अशी मागणी होत आहे.
गेल्यावर्षी तारकर्ली बंदर येथे बंदर विभागाने कोट्यवधी रुपये खर्चून सुसज्ज अशी बेटी उभारली. मात्र, वर्ष पूर्ण होण्याच्या अगोदरच या जेटीवर ठिकठिकाणी अज्ञात व्यक्तींनी खड्डे पाडल्याचे दिसून आले आहे. या खड्ड्यांमुळे सुसज्ज जेटीचे नुकसान झाले आहे. जेटीचे नुकसान करण्यात आल्यानंतरही बंदर विभागाने याकडे दुर्लक्ष केले आहे. तसेच याप्रकरणी कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही. त्यामुळे बंदर विभागाने हे खड्डे कोणी व केले याची चौकशी करून संबंधितांविरोधात सरकारी मालमत्तेचे नुकसान केल्याप्रकरणी कारवाई करण्याची मागणी होत आहे.
या बंदर जेटीजवळ पदपथ (फूटपाथ) बनविण्यात आला आहे. या पदपथावरही मोठ्या प्रमाणात अतिक्रमण करण्यात आले आहे. पदपथावरच अतिक्रमण होत असेल तर त्या पदपथाचा उपयोग काय असा प्रश्न स्थानिक विचारत आहेत. त्यामुळे बंदर विभागाने याकडेही लक्ष पुरवत पाऊल मार्गावर झालेले अतिक्रमण हटविण्याची कार्यवाही करावी अशी मागणी होत आहे.























































