नऊ मालिका विजयांनंतर हिंदुस्थानचा पराभव : तिसऱ्या वनडेसह इंग्लंडने मालिका जिंकली

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन | लीड्स

तीन द्विपक्षीय वनडे क्रिक्रेट मालिका विजय आणि सुमारे ३० महिन्यांनंतर कर्णधार विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील टीम इंडियाला दारुण पराभवाला सामोरे जावे लागले आहे. यजमान इंग्लंडने मंगळवारी हेडींगलेच्या तिसऱ्या वनडे सामन्यात हिंदुस्थानला ८ विकेट आणि ३३ चेंडू राखून सहज पराभूत केले आणि विराट सेनेची विजयी दौड रोखत मालिका २-१ अशी जिंकली.  शतकवीर जो रूट (नाबाद १०० ) आणि कर्णधार इयान मॉर्गन (नाबाद ८८ ) हे इंग्लंडच्या शानदार विजयाचे शिल्पकार ठरले. रूट -मॉर्गन जोडीने तिसऱ्या विकेटसाठी नाबाद १८६ धावांची भागीदारी रचत हिंदुस्थानी संघावर पराभवाचा कलंक लादला.

टी-२० मालिका २-१ अशी गमावणाऱ्या इंग्लंडने वनडे क्रिकेटमधली आपली बाद्शाहत सिद्ध करीत टीम इंडियाला या मालिकेत पराभूत केले. नाणेफेक जिंकून हिंदुस्थानला प्रथम फलंदाजीस पाचारण करीत यजमान संघाने ५० षटकांत ८ बाद २५६ या धावसंख्येवरच रोखले. प्रथम फलंदाजी करताना हिंदुस्थानने इंग्लंडसमोर २५७ धावांचे आव्हान ठेवले . कर्णधार कोहलीच्या ७१, शिखर धवन ४४ आणि शार्दुल ठाकूरच्या नाबाद २२ धावांच्या बळावर टीम इंडियाने ५० षटकात ८ बाद २५६ धावा केल्या. इंग्लंडकडून रशिद आणि विलीने प्रत्येकी तीन बळी घेतले तर वूडला एक बळी मिळाला.

रूटने रोखला हिंदुस्थानी विजयाचा “रूट”

टीम इंडियाच्या विजयाचा मार्ग मंगळवारी पुन्हा इंग्लंडच्या जो रूटनेच रोखला. हिंदुस्थानी फिरकी निष्प्रभ ठरवत रूटने लॉर्ड्सप्रमाणे याही लढतीत नाबाद शतक झळकावले. रूटने आपल्या २९व्या वनडे शतकासाठी १२० चेंडू घेतले .त्याच्या नाबाद शतकी खेळीत १० चौकारांचा समावेश होता. कर्णधार इयान मॉर्गननेही १०८ चेंडूंत नाबाद ८८ धावांची खेळी केली. त्याच्या नाबाद खेळीतही ९ चौकार आणि १ षटकार समाविष्ट होते . रूट -मॉर्गन जोडीने तिसऱ्या विकेटसाठी नाबाद १८६ धावांची धडाकेबाज भागीदारी रचत टीम इंडियावर मोठा पराभव लादला.

रशीद चालला ,कुलदीप ,चहल फ्लॉप

लीड्सच्या मैदानावर इंग्लंडच्या आदिल रशीदने आपल्या फिरकीने धुमाकूळ घातला. पण हिंदुस्थानचे एरवी धोकादायक वाटणारे फिरकी गोलंदाज कुलदीप यादव आणि युझवेन्द्र चहल मात्र सुपरफ्लॉप ठरले. या दोघांनी एकूण २० षटके टाकत ९६ धावा मोजल्या पण त्यांना इंग्लंडचा एकही फलंदाज बाद करता आला नाही. हिंदुस्थानच्या वतीने केवळ शार्दूल ठाकूरला १० षटकांत ५१ धावांच्या मोबदल्यात १ फलंदाज बाद करता आला.