
‘ख्वाडा’ आणि ‘बबन’ या चित्रपटांतून ग्रामीण, वास्तविक जीवनातील समस्येवर भाष्य करणारे राष्ट्रीय पुरस्कार विजेते दिग्दर्शक भाऊराव कऱ्हाडे आता चक्क कॉमेडी जॉनरचा सिनेमा घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. ‘टीडीएम’ असे या सिनेमाचे नाव असून यानिमित्ताने भाऊराव पहिल्यांदाच या वेगळय़ा धाटणीच्या चित्रपटाचे दिग्दर्शन आणि निर्मितीदेखील करणार आहेत. नुकतेच चित्रपटाचे पोस्टर भेटीला आले आहे. पोस्टरमध्ये पाठमोरा व्यक्ती नेमका कोण आहे हा प्रश्न सर्वांनाच पडला असेल. शिवाय पोस्टरवरील गावाकडील रम्य सकाळ पाहता चित्रपटाचे कथानक नेमके काय असेल, याची उत्सुकता अधिकच ताणली जात आहे. चित्रपटाची कथा, पटकथा आणि संवादाची जबाबदारी बी. देवकाते आणि भाऊरावांनी सांभाळली आहे. ‘टीडीएम’ या नावातच वेगळं काहीतरी असणाऱ्या आणि हास्याची मेजवानी घेऊन येणाऱ्या या सिनेमाची रंगत भाऊरावांनी कुठवर नेऊन ठेवली आहे हे लवकरच प्रेक्षकांना पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
























































