
देशात लोकशाही आहे काय, सध्या देशात दबावाचे वातावरण आहे. राजकीय हेतूने सूडबुद्धीने प्रेरीत होऊन अशा कारवाया करण्यात येत आहेत, असे मत पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केले. शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावर ईडीने केलेल्या कारवाईबाबत त्यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे. पुण्यात ते पत्रकारांशी बोलत होते.
राजकीय हेतूने ईडी आणि केंद्रीय तपास यंत्रणा कारवाई करत आहेत. आता भाजप नेते आता उघड उघड आव्हाने देत आहेत. भाजप नेत्यांनी धमकी दिल्यानंतर अशा कारवाया होत आहेत. त्यामुळे आपला देश नेमक्या कोणत्या दिशेने जात आहे, याचा विचार जनतेने करण्याची गरज आहे, असेही आदित्य ठाकरे म्हणाले. शिवसेना आणि महाविकास आघाडी एकत्र आहे. आमची एकजूट कायम असून आम्ही ताकदीने उभे आहोत. जनतेला आमची ताकद माहित आहे. आम्ही कोणत्याही दबावापुढे झुकणार नाही, असा विश्वासही आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केला.
ही कारवाई राजकीय हेतूने होत आहे. त्यामुळे या कारवाईबाबत आणखी काय बोलणार, असे ते म्हणाले. या घटनांमुळे न्यायप्रक्रिया आणि लोकशाही देशात आहे काय, याचा विचार करणे गरजेचे आहे. अशा घटनांमुळे देश कोणत्या दिशेने जात आहे, याचा विचार करणे गरजेचे आहे. भाजप नेते धमक्या देऊन कारवाया करत आहे, त्यामुळे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत, असेही ते म्हणाले.

























































