
सामना ऑनलाईन,मुंबई
आफ्रिकन ग्रे पॅरोट, ब्ल्यू गोल्ड मकाव, ब्लॅक स्वान यांसारख्या परदेशी पक्ष्यांना जवळून पाहण्याची संधी मुंबईकरांना मिळणार आहे. एस्सेल वर्ल्डने ‘पक्षी उद्यान’ (बर्ड पार्क) सुरू केले असून या उद्यानात विविध प्रजातींचे 500 हून अधिक पक्षी रहायला आले आहेत. विशेष म्हणजे या पक्ष्यांसोबत मुंबईकरांना सेल्फी काढता येणार आहे तसेच स्वतःच्या हाताने त्यांना खाऊदेखील भरवता येणार आहे.
गोराई येथील एस्सेल वर्ल्ड वॉटर किंगडम या थीम वॉटर पार्कजवळच हे पक्षी उद्यान उभारण्यात आले आहे. उद्यानात विविध प्रकारच्या 200 प्रजातींची झाडेझुडपे असून यात उडणारे, जमिनीवर आणि पाण्यात राहणारे असे विविध भागातील पक्षी वास्तव्यास असणार आहेत. या उद्यानाची काळजी घेण्यासाठी खास तज्ञांची नेमणूक करण्यात आली आहे. तसेच येथे पक्ष्यांसाठी खास स्वयंपाकगृह आणि आरोग्य केंद्रही असणार आहे.पक्षी उद्यानाविषयी बोलताना एस्सेल वर्ल्ड लीझरचे सीईओ शिरीष देशपांडे यांनी सांगितले, ‘पक्षी उद्यान हा एस्सेल वर्ल्डचा ड्रीम प्रोजेक्ट आहे. या प्रोजेक्टच्या रूपात पक्ष्यांविषयी जनजागृती करण्याचा आमचा प्रयत्न आहे.’
पक्षी उद्यानात काय पहाल
- आफ्रिकन ग्रे पॅरोट, ब्ल्यू गोल्ड मकाव, कॉकाटेल, रेनबो लोरिकीट, टौकान, ब्लॅक लोरी, वॉयलेट टुराको यांसारखे उडणारे पक्षी, कॅलिफोर्निया क्वेल, गोल्डन फिजंट, ऑस्ट्रिच, ब्लॅक स्वान, अमेरिकन वूड डक, मॅडरिन डक यांसारखे पाणपक्षी.
- उद्यानात विदेशी पक्ष्यांना जवळून पाहता येईल. या पक्ष्यांना पर्यटक स्वतःच्या हाताने खाणे देऊ शकतील. तसेच फोटोही काढता येईल.
- फीडिंग डेक, रेनफॉरेस्ट वॉक, रेनबो वॉक तसेच शॉपिंगही करता येईल. शॉपिंग नेस्ट व वुडपेकर्स स्टेडियम नावाचे ऍम्पी थिएटरही येथे आहे.
- पक्ष्यांसोबत संवाद साधता येईल तसेच देशातील पहिल्या वॉक इन एविअरचा समावेशही येथे आहे.






























































