
इटलीने इंग्लंडला पेनल्टी शूटआऊटमध्ये हरवून तब्बल 53 वर्षांनंतर युरो फुटबॉल चॅम्पियनशिप जिंकून नवा अध्याय लिहिला. पण या वेळी युरोप खंडातील या मानाच्या स्पर्धेला गालबोट लागल्याची घटना घडली. इंग्लंडचा पराभव पचनी न पडलेल्या चाहत्यांनी पेनल्टी चुकलेल्या मार्कस रॅशफोर्ड, जेडन सँचो व बुकायो साका या तीन खेळाडूंवर वर्णद्वेषी शेरेबाजी केली. इंग्लंड फुटबॉल असोसिएशनने यावर नाराजी व्यक्त केली असून या प्रकरणात दोषी सापडलेल्यांवर कारवाई करण्याचे आदेश या वेळी देण्यात आले आहेत. लंडन मेट्रोपोलिटन पोलीस या प्रकरणाची चौकशी करीत आहेत. पण इंग्लंडच्या चाहत्यांकडून करण्यात आलेल्या शेरेबाजीवर जगभरातून टीका करण्यात येत आहे.
49 जणांना अटक
दरम्यान, इंग्लंड व इटली यांच्यामधील फायनल लढतीदरम्यान स्टेडियममध्ये नियम तोडणाऱया 49 जणांना अटक करण्यात आली आहे. तसेच या कारवाईत 19 पोलीस अधिकारीही जखमी झाले आहेत. लंडनची मेट्रोपोलिटन पोलीस रात्रभर ही कारवाई करीत होते.
खेळाडूंच्या नावासह ‘मंकी इमोजी’
पेनल्टी चुकलेल्या तिन्ही खेळाडूंच्या नावावर मंकी अर्थातच माकडांच्या इमोजीचा वापर करण्यात आला आहे. तसेच बुकायो साका याच्यासाठी अभद्र भाषेतून शेरेबाजी करण्यात आली आहे. एवढेच नव्हे तर या स्पर्धेमध्ये इंग्लंडसाठी छान कामगिरी करणाऱया रहीम स्टर्लिंगलाही टार्गेट करण्यात आले आहे.
विवादीत ट्विट डिलीट अन् अकाऊंट सस्पेंड
इंग्लंडच्या फॅन्सकडून वर्णद्वेषी शेरेबाजी करण्यात आली. हे प्रकरण गंभीर होत आहे हे लक्षात येताच ट्विटरकडून विवादीत ट्विट डिलीट करण्यात आले. तसेच अशा प्रकारचे ट्विट करणाऱयांचे अकाऊंटही सस्पेंड करण्यात आलेत. सोशल मीडिया कंपनीने याच्याविरोधात कडक पाऊल उचलायला हवे, अशी मागणीही या वेळी करण्यात आली आहे.
























































