घोडीला साप चावला आणि सिरमचा जन्म झाला! लाखोंचे प्राण वाचवणाऱ्या डॉ. सायरस पुनावालांची विशेष मुलाखत.

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

   >>आसावरी जोशी 

डॉ. सायरस पूनावाला. लस निर्मिती क्षेत्रातील देशातील प्रथम क्रमांकाचे नाव. अल्पावधीत अब्जावधी कोरोना १९ लसींची निर्मिती करून या सोन्याच्या हातानी कोरोनाला सहज थोपवले.. आणि आपले  कोरोनाशी युद्ध अधिक सोपे केले. 

   नातं.. दोन अक्षरी शब्द.. कशाशी असतं आपलं नातं.. माणसांशी. निसर्गाशी.. लहानपणी तर अगदी निर्जीव गोष्टींशीसुद्धा.. पुढे जाणीवा प्रगल्भ होऊ लागतात.. नात्यांचा हा टप्पा अनेक पायऱ्या ओलांडतो..नात्यांना बांधिलकीचे कोंदण चढते.. मग ती बांधिलकी माणसांशी असते.. जननीशी असते.. जन्मभूमीशी असते.. कामाशी असते.. कर्मभूमीशी असते.. समाजाशी असते.. समाजाच्या उपयोगी पडण्याशी असते.. इराणमधून आलेला पारसी समाज..आपल्या कष्टाने, मेहनतीने महाराष्ट्रात विशेषत: मुंबईत पाय रोवले.. स्थायिक झाला.. स्वत:चे वैशिष्ट्य जपत इथल्या संस्कृतीशी सहज एकरूप झाला.. व्यवसाय.. उदीमात आभाळभर यश मिळवले.. पण जमिनीवरचे पाय कधी सुटले नाहीत.. उलट सामाजिक भान आणि बांधिलकी जपत या समाजाशी असलेले प्रत्येक सामाजिक बांधिलकीचे नाते हा समाज जपत राहिला.. किती नावे घ्यावीत.. होमी भाभा.. फिल्डमार्शल साम माणेकशॉ.. जे आर डी टाटा.. रतन टाटा.. सायरस पूनावाला.. ही यादी न संपणारी आहे..

 दोन वर्षांपूर्वी कोरोना या महाभयंकर रोगाने साऱ्या जगात आपले हातपाय पसरले आणि जगण्याची सारी परिमाणेच बदलली..माणूस माणसापासून दूर झाला.. सामाजिक अंतर जाणीवपूर्वक वाढवलं गेलं..आणि ते वाढतच गेलं.. अनेक कोविड योद्धे आघाडीवर लढत असताना अनेक डॉक्टर्सनी मात्र शस्त्रे खाली ठेवली होती.. कोणाचाच पायपोस कोणाच्या पायात उरला नव्हता.. हळूहळू कोविड योद्ध्यांना कोरोनाशी लढण्याचे तंत्र सापडू लागले.. सामाजिक अंतर, वारंवार हात धुणे, बाहेरून आल्यावर आंघोळ करणे.. स्वच्छता राखणे.. या साऱ्या आयुधांच्या सोबतीने आता प्रवास सुरु झाला होता कोरोनाला लशीच्या सहाय्याने थोपविण्याचा..रशियाने सर्वप्रथम लस शोधून काढली. पण ब्रिटनच्या ऑक्सफर्ड विद्यापीठात शोधल्या जाणाऱ्या लशीवर सर्वांच्या आशा केंद्रित झाल्या होत्या. ऑक्सफर्डचा हा प्रकल्प एक्स्ट्रा झेनेका या ब्रिटीश – स्वीडिश औषध निर्माण संस्थेसोबत सुरु झाला. जुलै महिन्यात या लशीच्या पहिल्या टप्प्यातील मानवी चाचणीचे यशस्वी परिणाम समोर आले. प्रकाशितही झाले. जगाला हव्या असलेल्या उत्तराच्या आपण जवळ पोहोचलो होतो. पण ही लस निर्माण करणाऱ्या ऑक्सफर्ड आणि झेनेकाला पुण्याच्या सिरम संस्थेशिवाय पुढे जाताच येणे शक्य नव्हते. कारण जगाला हवी असलेली अब्जावधी लशींची गरज आणि त्यासाठी उपलब्ध असलेला अत्यंत कमी वेळ. कोविशिल्ड्ची जबाबदारी अशा पद्धतीने सिरमकडे आली. पुण्याच्या हडपसर – मांजरी परिसरातील शेकडो एकराच्या सिरम संस्थेच्या परिसराकडे सारे जग डोळे लावून बसले होते. कारण या महामारीतून जगाला बाहेर काढू शकणाऱ्या लशीचे अब्जावधी डोस तिथे तयार होणार होते.

 आजमितीला जगात सर्वाधिक लशींचे उत्पादन सिरम करते. वर्षाला १.५ अब्ज डोसेस, म्हणजे जगाच्या एकूण गरजेच्या ६५% उत्पादन एकटी सिरम करते. जगातील १७० देशांना सिरम लशी पुरवते. २०२० मध्ये लॉकडाऊन झाल्यानंतर विमाने बंद झाली. पण सिरमचे काम थांबणे कोणालाच परवडण्यासारखे नव्हते. त्यामुळे वंदे हिंदुस्थानसारख्या विशेष योजनांमधून आवश्यक तंत्रज्ञांना येथे आणले गेले.

 देशातील पहिल्या दहा लक्ष्मीपुत्रांपैकी एक, अश्वशर्यतीतील देशातील बडे नाव. सिरम इन्स्टिट्यूट या देशातील सर्वात मोठ्या लस उत्पादन संस्थेचे संस्थापक, अध्यक्ष. आलिशान गाड्यांचा ताफा बाळगणारे रईस, यापलीकडे जाऊन डॉ. सायरस पूनावाला यांची ओळख आहे ती त्यांच्या सामाजिक कामाची. हीच त्यांची समाजाप्रती असलेली बांधिलकी त्यांचे वेगळेपण सिद्ध करते. अगदी त्यांच्याच शब्दात सांगायचे झाले तर सर सांगतात की मी एरव्ही व्यवसायातून प्रचंड पैसे कमवू शकलो असतो.. पण मला समाजोपयोगी कार्य करायचे होते..

या मुलाखतीसाठी सरांना फोन केला आणि अस्खलित मराठीत जवळ जवळ सव्वा तास त्यांनी माझ्याशी गप्पा मारल्या. मला वेगळे प्रश्न विचारायलाच लागले नाहीत.. डॉ. पूनावाला सांगतात.. सुमारे ५० वर्षांपूर्वीची देशातील आरोग्य स्थिती भयानक होती. गोवरसारख्या विषाणूजन्य रोगासाठी कोणतीही लस उपलब्ध नव्हती. विविध रोगावरील लसींच्या अभावाने असंख्य बालकांचा मृत्यू होत असे. यावर काहीही उपाय नव्हता. खरेतर डॉ. पूनावाला यांना लस उत्पादन क्षेत्रात येण्याचे काहीच कारण नव्हते. त्यांच्या कुटुंबाचा अश्वपालनाचा व्यवसाय होता. त्यांच्या वडिलोपार्जित कामात पूनावाला यांचे फार्महाउस सगळ्यात मोठे म्हणून गणले जाते. पुढे त्यांच्या असे लक्षात आले की आपल्या देशात त्यांच्या या व्यवसायाला मर्यादा आहेत. त्यामुळे त्यांनी मोटार व्यवसायाचा विचार केला. पण त्यासाठी फार मोठ्या भांडवलाची गरज होती.

डॉ. पूनावाला आठवून पुढे म्हणाले की यादरम्यान त्यांची शर्यतीची घोडी होती. तिला साप चावला. त्यासाठी त्यांना सिरम हवे होते. त्यावेळी त्यांनी हाफकिन संस्थेला संपर्क केला. पण त्यांना ते सिरम मिळण्यात खूप अडचणी आल्या आणि त्यातच त्यांच्या घोडीचा मृत्यू झाला. तेव्हा त्यांच्या फार्म हाउसमधून निवृत्त झालेल्या घोड्यांना सरकारच्या हाफकिन संस्थेत लस तयार करण्यासाठी दिले जात होते. हाफकिन घोड्याच्या सिरममधून अर्थात घोड्यांच्या रक्ताच्या द्रवातून लस तयार करीत होते. आपण दिलेल्या घोड्यांच्या सिरममधून जर हाफकिन लस तयार करीत असेल तर आपणच का नाही लस तयार करायची..यातून १९६६ मध्ये पुण्यात डॉ. पूनावाला यांनी सिरम संस्थेची स्थापना केली. त्यानंतर दोनच वर्षात सिरमने tetanus ची  लस तयार केली. येथे सर सांगतात की ज्या काळात आम्ही सिरम सुरु केली तेव्हा tetanus च्या लसींचा खूपच तुटवडा होता. त्यामुळे अनेक बाळांचे मृत्यू होत होते. माणसाना जखम झाल्यास धनुर्वात होण्याची दाट शक्यता होती. त्यामुळे tetanus ही पहिली लस तयार करण्यात आली. पुढे गोवर, गालगुंड यांच्यावरील लसी १९७१ मध्ये करण्यात आल्या. त्यांच्या किमती सुरुवातीपासूनच अत्यंत कमी ठेवण्यात आल्या. तोच न्याय कोरोनाच्या लसीबाबत लागू झाला. अत्यंत नगण्य किमतीत कोरोनाची लस विकली जाते.

आज लोकांना कोरोनाचे भय वाटेनासे झाले आहे. त्यामुळे बुस्टर डोस घेण्याकडे त्यांचे दुर्लक्ष होते आहे. याबाबत डॉ. पूनावाला सांगतात की लोकांनी सजग आणि सावध राहिले पाहिजे. आज कोरोनाचा धोका जरी टळला असला तरी सतत वेगवेगळे व्हेरीयंट निर्माण होत आहेत. पण आम्ही त्यासाठी सज्ज आहोत. सिरमचे उद्दिष्ट नेहमीच लोकांचा जीव वाचवणे हा राहिला आहे.

सर सांगतात, जेव्हा ते त्यांच्या कुटुंबाबरोबर असतात तेव्हा ते सर्वाधिक खुश असतात. त्यांच्या पत्नीच्या विलो पूनावाला यांच्या नावाने ट्रस्ट सुरु आहे. त्याच्या माध्यमातून गरिबांसाठी मोफत लसीकरण होते. आता त्यांनी सगळी जबाबदारी त्यांचा पुत्र अदर पूनावालाकडे सोपविली आहे. त्यांचे सारे कुटुंबच सामाजिक बांधिलकी मानणारे आहे. त्यांचा पूनावाला क्लीन सिटी प्रकल्प साऱ्या पुण्याचे भूषण ठरला आहे. ते म्हणतात, सिरमच्या स्थापनेच्या पहिल्या दिवसापासून सर्वसामान्यांना परवडणाऱ्या किमतीत जीवनावश्यक लसी उपलब्ध व्हाव्यात असा माझा मानस होता. हिंदुस्थानातील आणि जगातील शेवटच्या बालकापर्यंत आवश्यक त्या लसी पोहोचेपर्यंत मी स्वस्थ बसणार नाही. ते स्वत: पेटंट मिळविण्याच्या विरुद्ध आहेत. पण दुसऱ्या कोणी या लसींचा गैरफायदा घेऊ नये यासाठी पेटंट मिळवावे लागते. आज जरी कोरोना अत्यंत आटोक्यात आला असला तरी आम्ही कायमच माझ्या देशाचे आरोग्ययोद्धा आहोत.

 संपूर्ण मुलाखत फोनवर झाल्याने असे वाटत होते की बोलण्यावर खूप मर्यादा पडतील. पण तो सव्वा तास असे वाटत होते की डॉ. पूनावाला माझ्यासमोरच बसले आहेत.. आणि अत्यंत दिलखुलास गप्पा मारत आहेत माझ्याशी..