आईची हत्या करून तुकडे करणाऱ्या निर्दयी मुलाला फाशी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

जन्मदात्या आईची निर्घृण हत्या करून तिच्या काळजाचे तुकडे भाजून खाण्याचा प्रयत्न करणाऱया निर्दयी मुलाला जिल्हा सत्र न्यायाधीश महेश जाधव यांनी मरेपर्यंत फाशीची शिक्षा सुनावली. सुनील रामा कुचकोरवी (35, रा. माकडवाला वसाहत, कावळा नाका) असे फाशीची शिक्षा झालेल्या मुलाचे नाव आहे. कावळा नाका परिसरातील माकडवाला वसाहत येथे मयत यलव्वा कुचकोरवी ही मुलासह राहत होती. तिचा मुलगा सुनील कुचकोरवी हा व्यसनाधीन असल्याने तो वारंवार पैशासाठी आईशी भांडण करत होता. 28 ऑक्टोबर 2017 रोजी सुनील याने आईकडे दारूसाठी पैशांची मागणी केली. आई पैसे देत नसल्याच्या रागातून त्याने घरातील सत्तूरने वार करीत आईचा खून केला. निर्दयीपणाचा कळस म्हणजे त्याने आईच्या शरीराचे तुकडे तुकडे केले. त्यानंतर ते भाजून खाण्याचा क्रूरपणा केला. शाहूपुरी पोलिसांनी या गुन्हाचा तपास करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते.