
सामना प्रतिनिधी, सोलापूर
भारतीय उष्णदेशीय मौसम विज्ञान संस्थेच्या (आयआयटीएम) कतीने सोलापूर जिल्ह्यात कृत्रिम पावसाच्या शास्त्रीय प्रयोगाला सुरुवात झाली. सप्टेंबरअखेरपर्यंत हा प्रयोग सुरू राहणार असल्याचे प्रकल्प संचालक तारा प्रभाकरन यांनी सांगितले. तारा प्रभाकरन म्हणाल्या, आयआयटीएमने 2018 मध्ये हा प्रयोग केला होता. आता पुन्हा हा प्रयोग केला जात आहे.
वर्षावाढीचा प्रयोग (कॅपेक्स) हा पृथ्वी विज्ञान मंत्रालयाचा प्रकल्प आहे. यासाठी आयआयटीएमने वेगाव येथील सिंहगड इन्स्टिटय़ूट आणि तुळजापूर येथील तुळजाभवानी कॉलेज ऑफ इंजिनीअरिंगमध्ये रडार बसवले आहेत. या रडारच्या माध्यमातून 200 कि.मी. त्रिज्येच्या क्षेत्रात ढग आणि पावसाचे निरीक्षण केले जाते. यासाठी सोलापुरात एक सेंटर उभारण्यात आले आहे. रडारच्या माध्यमातून दर दहा मिनिटाला आयएमडीच्या वेबसाइटवर वातावरणाचा अंदाज येतो. ढगांची स्थिती लक्षात येते. या माहितीच्या आधारे सीडिंग केले जाते. या कार्यक्रमासाठी दीर्घकालीन निरीक्षणे आणि मूल्यांकन आवश्यक आहे, असेही त्यांनी सांगितले.

























































