पूरग्रस्त भागांत काम करणाऱ्या कामगारांना दुप्पट मोबदल्याची बक्षिसी!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सांगली, कोल्हापूरसारख्या ठिकाणी या वर्षी झालेल्या महापुरात बृहन्मुंबई महानगरपालिकेचे शेकडो कर्मचारी मदतकार्यासाठी धावून गेले होते. पुरातील बचावकार्यासह पुरानंतरची स्वच्छता, वैद्यकीय सेवा, मदतकार्याचे मोठे काम पालिकेच्या कर्मचाऱयांनी केले. या कामाबद्दल पालिकेने संबंधित सर्व कर्मचाऱयांचा गौरव करण्याचा निर्णय घेतला असून या ‘ड’ वर्ग कामगारांना त्यांनी केलेल्या कामाच्या दिवसांच्या दुप्पट वेतन देण्यात येणार आहे.

पूरग्रस्त भागातील पुनर्वसनाबाबत कार्यवाही करण्याची मोठी जबाबदारी राज्य सरकारने पालिका आयुक्त प्रवीण परदेशी यांच्यावर सोपवली आहे. आयुक्त परदेशी यांनी पूरग्रस्त भागांत उपस्थित राहून मदतकार्य, स्वच्छता, पुनर्वसनाच्या कामाचा वारंवार आढावा घेतला.

…तर खातेप्रमुख, अधिष्ठाता, सहाय्यक आयुक्त जबाबदार
बचावकार्य, मदत आणि पुनर्वसनासाठी गेलेल्या कर्मचाऱ्यांना अतिरिक्त वेतन देण्याबाबत सर्व खातेप्रमुख, अधिष्ठाता, सहाय्यक आयुक्त यांनी आवश्यक माहिती मानव संसाधन विभागास तातडीने कळविण्यात यावी असे आदेश प्रशासनाकडून देण्यात आले आहेत. यामध्ये माहिती कळविण्यास उशीर झाल्यास किंवा चुकीची माहिती दिल्यामुळे संबंधित कर्मचाऱयाला अतिरिक्त वेतन न मिळाल्यास सर्वस्वी जबाबदारी खातेप्रमुख, अधिष्ठाता, सहायक आयुक्तांची राहील असा इशाराही देण्यात आला आहे.

असे मिळणार अतिरिक्त वेतन
‘ड’ वर्ग कर्मचारी – 1 ते 8 दिवसांपर्यंत 15 दिवसांचे वेतन, आणि आठ दिवसांपेक्षा जास्त असल्यास पूर्ण एका महिन्याचे वेतन
‘अ’, ‘ब’ व ‘क’ वर्ग कर्मचारी-अधिकारी – आठ दिवसांचे पूर्ण वेतन