जादा नफ्याचे आमिष दाखवून दीड कोटींची फसवणूक

जे. के. व्हेंचेर्स नावाची बोगस कंपनी स्थापन करून भरपूर नफा देण्याचा आमिषाने एकाला तब्बल 1 कोटी 45 लाखांचा गंडा घातला आहे. ही घटना पुण्यात जानेवारी 2017 ते नोव्हेंबर 2020 मध्ये घडली.

याप्रकरणी प्रणय उदय खरे (वय 28, रा. साळुंखे विहार, कोंढवा) याच्याविरूद्ध चतुःशृंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अश्विनीकुमार बळीराम कांबळे (वय 44) यांनी तक्रार दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी प्रणयने बोगस जे. के. व्हेंचेर्स नावाची कंपनी स्थापन केली होती. त्यानंतर त्याने गुंतवणूकदारांना रत्नागिरीत तब्बल 7 हजार एकर जागा घेतल्याचे सांगितले. त्यानुसार संबंधित जागेत 15 वर्षांसाठी गुंतवणूक केल्यास पहिल्या 11 गुंतवणूकदारांना 1 कोटी रूपये देण्याचे आमिष दाखविले.

त्यानुसार अश्विनीकुमार यांनी 2017 मध्ये जे. के. व्हेंचेर्स कंपनीत 1 कोटी 45 लाख 17 हजार रूपये गुंतविले. मात्र, प्रणयने त्यांना कोणताही मोबादला न देता फसवणूक केली आहे. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक माने तपास करीत आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या