
कोरोनाचा प्रकोप कमी होऊन आता जनजीवन सामान्यपदावर येत असून, राज्याची लाइफलाइन असणारी एसटी अर्थात लालपरीदेखील वेग घेऊ लागली आहे. एसटी महामंडळाला येणाऱ्या दिवाळी सणाकडून मोठी अपेक्षा असून, यासाठी जिल्ह्यातून जादा गाडय़ांचे नियोजन करण्यात आलेले आहे. यात सर्वाधिक प्रवासी असणाऱ्या पुणे, कल्याण आणि नाशिक मार्गावर जादा गाडय़ा सोडण्यात येणार आहेत.
नगर जिल्ह्यात सध्या पुणे मार्गावर एकटय़ा नगरवरून 85 गाडय़ा धावत असून, पुण्यातून दिवाळी सणासाठी येणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठी असल्याने नगरमधून 52 जादा बसेस पुण्याला सोडण्यात येणार आहेत. यासह संभाजीनगर, बीड, जालना, मनमाड, वैजापूर, नाशिक या मार्गावरूनदेखील त्या त्या जिल्ह्यात एसटी बसेस नियमितपणे नगर जिल्ह्यातून जातात. सध्या नगरमधून दर अर्ध्या तासाला पुण्याला एसटी बसेस सोडण्यात येत आहेत. नगरमधून कल्याण आणि नाशिक मार्गावरदेखील जिल्ह्यातील प्रत्येक डेपोतून किमान एक अतिरिक्त गाडी दिवाळीदरम्यान सोडण्यात येणार आहेत. दरम्यान, शनिवारपासूनच जिल्ह्यातून जादा बसेस धावण्यास सुरुवात झाल्याचे एसटीचे विभागीय नियंत्रक विजय गिते यांनी सांगितल.
























































